अहमदनगर Live24 टीम, 08 जानेवारी 2022 :- जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा एकदा वाढू लागला आहे. यातच संगमनेर शहरात तातडीने जम्बो कोविड सेंटर उभारण्यात यावे, अशा सूचना राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी प्रशासनाला दिल्या.
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या शक्यतेच्या पार्श्वभूमीवर तयारी म्हणून हे आदेश महसूलमंत्र्यांनी प्रशासनाला दिले आहे. दरम्यान महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांची कोरोना चाचणी निगेटीव्ह आल्यानंतर त्यांनी नुकतेच संगमनेर शहरात प्रशासकीय अधिकारी व पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन कोरोना परिस्थिती व उपाययोजनांचा आढावा घेतला.
संगमनेर शहर व तालुक्यात कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण चांगल्या प्रकारे झाले. मात्र, अनेक नागरिकांचा लसीकरणाचा दुसरा डोस घेणे बाकी आहे.
त्यामुळे प्रशासनाने स्थानिक पदाधिकाऱ्यांची मदत घ्यावी आणि १०० टक्के लसीकरणाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी काम करावे, असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी थोरात यांनी कोरोना संकटाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर उपाययोजना व तयारीचा आढावा घेत संगमनेर शहरात जम्बो कोबड सेंटर उभारावे, अशा सूचना प्रशासनाला दिल्या.