संगमनेर

Sangamner News : सरपंच पदासाठी तिरंगी लढत ! सदस्य पदाच्या ११ जागांसाठी २७ उमेदवार रिंगणात

Sangamner News : संगमनेर तालुक्यातील आश्वी खुर्द ग्रामपंचायतीच्या पंचवार्षीक निवडणूकीसाठी महसुलमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील व माजी महसूलमंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या समर्थकांचे गट आमने-सामने उभे ठाकले असून अटीतटीच्या दुरंगी लढतीतबरोबरचं अपक्ष उमेदवार दाखल झाल्याने निवडणुकीत रंगत वाढली आहे.

याठिकाणी लोकनियुक्त सरपंच पद सर्वसाधारण प्रवर्गातील महिलेसाठी राखीव असल्यामुळे विखे पाटील गटाकडून अलका बापूसाहेब गायकवाड तर थोरात गटाकडून शालिनी दत्तात्रय सोनवणे या रिंगणात उतरले असून

सोनाली मोहित गायकवाड या अपक्ष उमेदवार म्हणून रिंगणात उतल्यामुळे सरपंच पदाची निवडणूक रंगतदार व अटीतटीची होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी दोन्ही गटाकडून सरपंच पदासाठी उमेदवारी १० अर्ज तर सदस्य पदाच्या ११ जागासाठी ४७ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले होते.

असे असले तरी आज २५ ऑक्टोबरला म्हणजे अर्ज माघारीच्या दिवशी अनेकांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतल्यामुळे निवडणूकीचे अंतिम चित्र स्पष्ट झाल्यामुळे अपक्ष उमेदवारांकडून प्रचाराला सुरुवात झाल्याची माहिती मिळाली आहे.

आश्वी खुर्द ग्रामपंचायतीवर महसुलमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील गटाची सत्ता ग्रामपंचायत स्थापनेपासून आजतागयात असल्याने थोरात गटही सत्ता आपल्याकडे खेचण्यासाठी एकास एक उमेदवार मैदानात उतरवले आहे.

दरम्यान, या निवडणुकीत आश्वी खुर्द ग्रामपंचायतीचे ३ हजार ३११ इतके मतदान आहे. या निवडणुकीत सदस्य पदासाठी २७ तर सरपंच पदासाठी ३ उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात उतरल्याचे काल बुधवारी (दि. २५) ऑक्टोबर रोजी म्हणजे माघारीच्या दिवशी स्पष्ट झाले आहे.

त्यामुळे आता ५ नोव्हेंबर रोजी सकाळी ७.३० ते ५.३० या वेळेत मतदान प्रक्रिया पार पडणार असून ६ नोव्हेंबर रोजी सकाळी मतमोजणी व निकाल जाहिर केला जाणार आहे. पुढील १० दिवस कार्यकर्ते व उमेदवार पायाला भिंगरी लावून प्रचार करण्याबरोबरच आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झाडणार आहेत.

असे असले तरी अपक्ष उमेदवार मात्र विखे पाटील गटांची डोकेदुखी वाढवण्याची चिन्ह असल्याने जेष्ठ नेते यावर काय उपाययोजना करतात याकडे मतदारांचे लक्ष लागले आहे.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts