शिर्डी

साईबाबा संस्थानला आठ दिवसांत १६ कोटी ६१ लाख रुपये दान प्राप्त

४ जानेवारी २०२५ अहिल्यानगर : श्री साईबाबा संस्थानला नाताळ सुट्टी, सरत्या वर्षाला निरोप, आणि नवीन वर्षाच्या स्वागतानिमित्त आयोजित शिर्डी महोत्सवात २५ डिसेंबर ते २ जानेवारी २०२५ या कालावधीत सुमारे ८ लाखांहून अधिक साईभक्तांनी श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले.

या काळात संस्थानला एकूण १६ कोटी ६१ लाख ८० हजार ८६२ रुपये देणगी मिळाल्याची माहिती संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी दिली.गाडीलकर यांनी पत्रकार परीषदेत सांगितले की,आठ दिवसांच्या कालावधीत दानपेटीतून ६ कोटी १२ लाख ९१ हजार ८७५ रुपये, देणगी काउंटरद्वारे ३ कोटी २२ लाख २७ हजार ५०८ रुपये, पी.आर.ओ. शुल्क पासद्वारे १ कोटी ९६ लाख ४४ हजार २०० रुपये आणि डेबिट/क्रेडिट कार्ड, ऑनलाईन, चेक/डीडी, मनी ऑर्डरद्वारे ४ कोटी ६५ लाख ७३ हजार ६९८ रुपये अशी एकूण १५ कोटी ९७ लाख ३७ हजार २८१ रुपये रोख स्वरूपात प्राप्त झाली.

त्याशिवाय संस्थानला ८०९.२२ ग्रॅम सोने (५४ लाख ४९ हजार ६८६ रुपये) आणि १४.३९८ किलो चांदी (९ लाख ९३ हजार ८९५ रुपये) अशी देणगी मिळाली.या कालावधीत श्री साई प्रसादालयात ६ लाखांहून अधिक साईभक्तांनी मोफत भोजनाचा लाभ घेतला, तर १ लाख ३५ हजारांहून अधिक साईभक्तांनी अन्नपाकिटांचा लाभ घेतला.

९ लाख ४७ हजार ७५० लाडू प्रसाद पाकिटांची विक्री होऊन संस्थानला १ कोटी ८९ लाख ५५ हजार रुपये प्राप्त झाले, तर ५ लाख ९८ हजार ६०० साईभक्तांनी मोफत बुंदी प्रसाद पाकिटांचा लाभ घेतला.संस्थानला मिळालेल्या या देणगीचा विनियोग श्री साईबाबा हॉस्पिटल, श्री साईनाथ रुग्णालय, श्री साई प्रसादालयातील मोफत भोजन, शैक्षणिक संस्था, बाह्य रुग्णांची मदत, साईभक्तांच्या सुविधांसाठी उभारण्यात येणारे उपक्रम आणि विविध सामाजिक कार्यांसाठी केला जातो, असे गाडीलकर यांनी सांगितले.

Sushant Kulkarni

Published by
Sushant Kulkarni

Recent Posts