Shirdi News : शेती महामंडळाच्या हजारो कामगारांनी शिर्डीतील अपर जिल्हाधिकारी कार्यालयावर विविध मागण्यांसाठी मोर्चा काढला. शासनाने कामगारांच्या कोट्यवधींच्या देय रकमा अदा कराव्यात, कामगारांना दोन गुंठे जागा व घर बांधून देण्याचे आश्वासन पूर्ण करावे, अशा घोषणा देत सोमवारी परिसर दणाणून सोडला.
कामगार नेते सुभाष कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी हजारो कामगारांनी मोर्चा काढला. अहमदनगर जिल्ह्यातील शेती महामंडळाची हजारो एकर जमीन सरकारच्या विविध उपक्रमांसाठी विनामूल्य देण्यात आली; मात्र जमिनी गेल्यामुळे अनेक रोजंदार कामगार बेकार झाले.
कामगारांच्या देय रकमा ९९ कोटी ५० लाख रुपये शेती महामंडळाकडे येणे असताना त्या दिल्या जात नसल्याने शेती महामंडळ कामगार कृती समितीच्या वतीने शिर्डीतील अपर जिल्हाधिकारी कार्यालयावर सोमवारी मोर्चा काढण्यात आला. मुख्यमंत्री तसेच महसूलमंत्र्यांनी मोर्चाची दखल घ्यावी, अन्यथा पुणे येथील शेती महामंडळाच्या कार्यालयाला घेराव घालण्याचा इशारा आंदोलकांनी दिला आहे.
यावेळी वेनुनाथ बोळींज, मनोज शिंदे, बाबासाहेब बोरूडे, भालचंद्र शिंदे, भिकन शिंदे, महिंद्र आहेर यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले, की सेवानिवृत्त, राजीनामा दिलेल्या तसेच मयत कामगारांच्या वारसदार व कामावर असलेल्या कामगारांना राहण्यासाठी दोन गुंठे जागा देण्यात यावी व पंतप्रधान आवास योजनेतून त्यांना घरे बांधून देण्यात यावी, असे न्यायालयाने आदेश केला असताना शासनाकडून कुठलीही कारवाई केली गेली नाही.
बोनस दिला गेला नाही. त्यामुळे कामगारांना २००६ पासून सहावा वेतन आयोग लागू करण्यात यावा, पाचव्या वेतन आयोगाचा ९९ कोटी ५० लाखांचा फरक काढण्यात आला आहे त्यापैकी कामगारांना फक्त १८ कोटी मिळाले उर्वरित ८१ कोटी रक्कम तात्काळ देण्यात यावी. कामगारांची देणे न देता विनामूल्य जमीन एम.आय.डी. सी साठी खासगी भांडवलदारांना देणे योग्य नाही, अशा मुद्द्यांवर अनेकांनी आपले मत व्यक्त केले.
राज्य सरकारने कामगारांच्या मागण्याची तात्काळ दाखल घ्यावी अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडू असा इशारा महाराष्ट्र राज्य शेती महामंडळ कामगार लढा कृती समितीच्या वतीने देण्यात आला. निवेदनावर अविनाश आपटे, चंद्रकांत भोसले, अशोक पाटील, ज्ञानदेव आहेर, नितीन गुरसळ, राजेंद्र मानकर व आदींच्या सह्या आहेत.