Ahmednagar News : मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी मनोज जरांगे यांनी अंतरवाली सराटी येथे उपोषण सुरू केले असून त्यास पाठिंबा देण्यासाठी काल बुधवारी श्रीरामपूरातही साखळी उपोषण सुरू करण्यात आले. विशेष म्हणजे या आंदोलनात महिलांनी सहभाग नोंदवून आरक्षणाची जोरदार मागणी केली आहे.
यावेळी तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी मनोज जरांगे यांनी सरकारला चाळीस दिवसांचा वेळ दिला होता. परंतू महाराष्ट्र राज्य सरकारने या चाळीस दिवसात कोणतीही भुमिका स्पष्ट न केल्याने मनोज जरांगे पाटील कठोर उपोषणाला बसले आहेत.
त्यांना पाठिंबा म्हणून राज्यभर गावा-गावात प्रत्येक तहसीलला मराठा समाजाचे लोक शांततेच्या मार्गाने साखळी उपोषण (दि. (२८) ऑक्टोबर पर्यंत करणार असून २८ तारखेपासून हे साखळी उपोषण हे आमरण उपोषणामध्ये विलिन होणार आहे. या दरम्यान गावा- गावामध्ये राजकीय पुढाऱ्यांना गाव बंदी, शहर बंदी, जिल्हा बंदी, असे शांततेच्या मार्गाचे आंदोलन करण्यात येणार आहे.
गावा-गावामधून कँडल मार्च काढण्यात येणार आहेत. ही सर्व रूपरेषा शांततेच्या युद्धाची असून ही सरकारला ना झेपणार ना पेलणार आहे. अशा स्वरूपाचे आंदोलन सुरू होत असून आपल्या श्रीरामपूर तहसील कार्यालयात आम्ही सर्व मराठा समाज बांधव आजपासून (दि. २८) पर्यंत साखळी उपोषणासाठी बसणार आहोत. या साखळी उपोषणाचे गांभिर्य आणि समाजाच्या मागण्या आपल्या मार्फत सरकारपर्यंत पोहचवाव्यात ही विनंती.
यावेळी साखळी उपोषण आंदोलनात नितीन पटारे, दिपक पटारे, बापूसाहेब वडितके, शंतनु फोपसे, एकनाथ डांगे, गणेश धुमाळ, किरण उघडे, चंद्रकांत शेळके, श्रीकृष्ण बडाख, आदींसह मोठ्या संखेने मराठा बांधवांनी सहभाग नोंदविला होता.
आज (दि.26) ऑक्टोबरला निपाणी वडगाव, मातापूर, मालुंजा, कारेगाव, भेर्डापूर, पढेगाव, बेलापूर, वळदगाव, उंबरगाव, लाडगाव आदी गावचे लोक साखळी उपोषणात सहभागी होणार आहेत.