अहमदनगर Live24 टीम, 24 नोव्हेंबर 2021 :- केंद्र सरकारने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशातील 110 कोटी लोकांना कोव्हीड लसीची मात्रा देण्याचा विक्रम केला आहे.
80 कोटी लोकांना मोफत धान्य उपलब्ध करून दिले. पेट्रोल डिझेलवरील कर माफ करून जनतेला दिलासा दिला. पण राज्य सरकार कर कमी करायला तयार नाही.
यांना दारूवरचे कर कमी करण्यात अधिक धन्यता वाटत असल्याची परखड टीका भाजपचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले आहे.
भारतीय जनता पक्षाच्यावतीने श्रीरामपूर येथे आयोजित केलेल्या मेळाव्यात आ. विखे पाटील यांनी आघाडी सरकारवर निशाणा साधत आगामी निवडणुकांचे रणशिंग फुंकले आहे.
तसेच महाविकास आघाडी सरकारवर टीकेची झोड उठवत पुढे बोलताना विखे म्हणाले, गावोगावी असंख्य प्रश्न निर्माण झाले आहेत. पण महाविकास आघाडी सरकारने मंत्री नबाब मलिक यांना पुढे करून जनतेचे लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न सुरू ठेवला आहे.
कोणी गांजा पिला की ड्रग्ज घेतले याच्याशी राज्यातील जनतेला देणेघेणे नाही. नागरिकांना त्यांच्या दैनंदिन गरजा महत्त्वाच्या आहेत.
मूळ प्रश्नापासून लक्ष विचलीत करण्यासाठीच महाविकास आघाडी सरकारने या प्रकरणाला अधिक महत्त्व दिले असल्याचे आ. विखे पाटील म्हणाले.
मागील दोन वर्षांच्या कार्यकाळात या सरकारने राज्यातील जनतेला कोणतीही मदत केली नसल्याचा आरोप करून, अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकर्यांना मदत करण्याऐवजी वीज कनेक्शन तोडण्याच्या नोटिसा सरकारने पाठविण्यात धन्यता मानली.