अहमदनगर Live24 टीम, 21 फेब्रुवारी 2022 :- जिल्हा पोलिसांनी ‘ऑपरेशन मुस्कान’ मोहिमेमध्ये हरवलेल्या, घरातून निघून गेलेल्या 497 व्यक्तींचा शोध घेतला. 15 जानेवारी ते 15 फेब्रुवारी 2022 ही मोहीम राबविण्यात आली.
यामध्ये 69 मुला-मुलींचा तसेच 428 महिला-पुरूषांचा समावेश आहे. शोध घेण्यात आलेल्या व्यक्तींना कुटूंबाच्या स्वाधीन करण्यात आले.
या मोहिमेत रस्त्यावंर, देवस्थान ठिकाणी भीक मागणारी मुले, पालकांशी वाद झाल्यानंतर घरातून निघून गेलेली मुले, अपहरण झालेल्या मुले तसेच हरवलेल्या महिला-पुरूषांचा शोध घेतला जातो.
गेल्या काही वर्षांपासून हरवलेल्या व अपहरण झालेल्या मुलांसह महिला-पुरूषांचा शोध घेऊन त्यांना पुन्हा कुटूंबाच्या स्वाधीन करण्यासाठी ‘ऑपरेशन मुस्कान’ ही मोहीम राज्यभरात राबविण्यात येत आहे.
नगर जिल्ह्यात 15 जानेवारी ते 15 फेब्रुवारी 2022 या कालावधीत मोहीम राबविण्यात आली. गेल्या महिनाभरात नगर जिल्ह्यात हरवलेली व अपहरण झालेली 69 मुले सापडली.
त्यात 59 मुली व 10 मुलांचा समावेश आहे. त्यांना पालकांच्या ताब्यात देण्यात आलेली आहे. तसेच घरातून निघून गेलेल्या महिला-पुरूषांचा या मोहिमेत शोध घेण्यात आला. यामध्ये 244 महिला व 184 पुरूष अशा 428 व्यक्तींचा समावेश आहे.
तीन वर्षांत 2063 व्यक्तींचा शोध :- दरवर्षी जिल्हा पोलीस दलाकडून एक महिना ‘ऑपरेशन मुस्कान’ मोहिम राबविली जाते. सन 2020, 2021 आणि 2022 या तीन वर्षांत ‘ऑपरेशन मुस्कान’ मोहिमेअंतर्ग एकुण 2063 व्यक्तींचा शोध घेण्यात आला आहे.
यामध्ये अपहरणाच्या गुन्ह्यातील 20 मुले, 167 मुली तसेच पोलीस ठाण्यात नोंद झालेल्या मिसिंग गुन्ह्यातील 943 पुरूष, 933 महिलांचा समावेश आहे.