Ahmednagar Politics : येत्या काही दिवसात मार्च महिन्याला सुरुवात होणार आहे. तसेच मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी आचारसंहिता सुरू होणार अशी माहिती काही मीडिया रिपोर्ट मधून समोर येत आहे. अर्थातच, लोकसभा निवडणुका लवकरच लागणार आहेत. यामुळे आता राजकीय सनई-चौघडे वाजू लागले आहेत.
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण महाराष्ट्रात राजकीय द्वंद्व सुरू झाले असल्याचे पाहायला मिळत आहे. राजकीय पक्ष कोणाला तिकीट दिले पाहिजे याची चाचपणी करत आहेत, उमेदवारांची लिस्ट फायनल केली जात आहे. दुसरीकडे राजकीय नेत्यांच्या माध्यमातून जनसंपर्क वाढवण्यास सुरुवात झाली आहे.
एकंदरीत आगामी निवडणुकांसाठी राजकीय पक्षांनी आणि नेत्यांनी कंबर कसली आहे. अहमदनगर जिल्ह्यात देखील अशीच परिस्थिती पाहायला मिळत आहे. जिल्ह्यात लोकसभेच्या दोन जागा आहेत. शिर्डी लोकसभा आणि नगर दक्षिण लोकसभा. सध्या यातील नगर दक्षिण लोकसभेतुन भाजपाचे डॉक्टर सुजय विखे पाटील हे प्रतिनिधित्व करत आहेत.
दुसरीकडे शिर्डी लोकसभेतून शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या गटातील सदाशिव लोखंडे हे मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत. दरम्यान आतापर्यंत महायुतीमधून शिर्डी लोकसभेची जागा एकनाथ शिंदे यांच्या गटाला आणि नगर दक्षिणची जागा भाजपा यांच्या वाट्याला जाणार असे चित्र पाहायला मिळत होते.
यानुसार इच्छुक उमेदवारांनी तयारी देखील सुरू केली आहे. अशातच मात्र भाजपाने एक गुगली टाकली आहे. आगामी लोकसभेच्या पार्श्वभूमीवर भाजपाने शिर्डी मतदारसंघात एक मेळावा घेतला आहे. बीजेपीने नुकताच आपले बूथप्रमुख, शक्ती केंद्रप्रमुख, युवा वॉरियर्स, भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते आणि आपल्या आघाड्यांचा मेळावा घेतला आहे.
यामधून भाजपाने जोरदार शक्ती प्रदर्शन केले असून शिर्डी मधून लोकसभा लढवण्याचे एक प्रकारे संकेत दिले आहेत. शिर्डीच्या जागेसाठी देखील भाजप उत्सुक असल्याचे यावरून स्पष्ट होत आहे. यामुळे महायुतीमध्ये जागा वाटपावरून घमासान माजणार का ? अशा चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाल्या आहेत. दरम्यान या मेळाव्यात भाजपाचे अनुसूचित जाती-जमाती मोर्चाचे अध्यक्ष खासदार समीर ओराव यांनी मार्गदर्शन केले आहे.
यावेळी ओराव यांनी बूथ जिंकले तर निवडणूक जिंकू असा संदेश देत आगामी निवडणुकीसाठीची रणनीती तयार केली आहे. यानिमित्ताने शिर्डी लोकसभेतील भाजपाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये जोरदार ऊर्जेचे संचारण झाले आहे. बीजेपीच्या येथील कार्यकर्त्यांमधला उत्साह आता शिगेला पोहोचला आहे.
यावेळी राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी विरोधकांच्या टीकेला उत्तर देण्यापेक्षा शासनाच्या योजना सर्वसामान्यांमध्ये पोहोचवण्याचे काम करा असे आवाहन कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना केले आहे. यावेळी नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधानपदावर बसवण्यासाठी अवघ्या काही दिवसांचा काळ शिल्लक असल्याचे म्हणत कामाला लागा असा संदेश विखे पाटील यांनी पदाधिकाऱ्यांना दिला आहे.
मात्र, या भाजपाच्या मेळाव्यामुळे विरोधकांची डोकेदुखी वाढण्याआधी महायुतीमधील घटक पक्षांची डोकेदुखी वाढू लागली आहे. शिर्डी लोकसभेत हा मेळावा घेऊन भाजपाने एका प्रकारे या जागेवर आपला दावा ठोकला आहे. भाजपाने एकनाथ शिंदे यांच्या गटाला थेट आव्हानच दिले आहे. यामुळे शिर्डीचे खासदार आणि पुन्हा येथून निवडणूक लढवू इच्छिणारे सदाशिवराव लोखंडे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता पसरली आहे.
यामुळे आता महायुतीमधून शिर्डीच्या जागेवर भाजपाचा उमेदवार उभा राहणार की एकनाथ शिंदे यांच्या गटातील उमेदवार उभा राहणार हे विशेष पाहण्यासारखे राहणार आहे. दुसरीकडे, महाविकास आघाडीमध्ये देखील या जागेसाठी काँग्रेस आणि उबाठा शिवसेना यांच्यात रस्सीखेच सुरू आहे. यामुळे शिर्डी लोकसभेची यंदाची निवडणूक सुद्धा विशेष रंगतदार होणार हे स्पष्ट झाले आहे.