Ahmednagar Politics : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव जय पवार यांनी काल (रविवारी) कर्जत-जामखेड मतदारसंघाचा दौरा करून महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांच्या भेटीगाठी घेतल्याने राजकीय निरीक्षकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
आमदार रोहित पवार यांच्या विरोधात ते विधानसभेची निवडणूक लढविणार असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. आमदार रोहित पवार यांच्याविरोधात पवार कुटुंबातीलच उमेदवार उभा राहतो की काय? अशी चर्चा सुरू झाली.
कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघात यंदाच्या विधानसभा निवडणुकीत रंग भरण्यास सुरुवात झाली आहे. आमदार रोहित पवार यांना घेरण्यासाठी विरोधी पक्षांसह मित्रपक्षही सरसावले आहेत. नुकतेच महाविकास आघाडीतील काँग्रेस, उद्धव सेना गटाने स्थानिक कार्यकर्त्यांच्या बैठका घेत मतदारसंघावर दावा ठोकला आहे.
यासह त्यांच्यावर नाराज असणारी तिसरी आघाडीही रणांगणात उतरली आहे. त्यांनी गावनिहाय बैठका घेत राजकीय परिस्थितीचा आढावा सुरू केला आहे.
काल जय पवार यांनी राशीन येथील जगदंबा देवीच्या मंदिरामध्ये जाऊन दर्शन घेतले. यानंतर कर्जत येथे संत गोदड महाराजंचे जन्मस्थळ व समाधी मंदिरातही त्यांनी दर्शन घेतले. सर्व ठिकाणी त्यांचा सत्कार करण्यात आला.
या दौऱ्यामध्ये जय पवार यांनी प्रवीण घुले पाटील, भाजपचे जिल्हा सरचिटणीस सचिन पोटरे, अशोक खेडकर, राष्ट्रवादी काँग्रेस विद्यार्थी संघटनेचे जिल्हाध्यक्ष ओंकार गुंड यांच्या निवासस्थानी भेट देऊन त्यांच्याशी संवाद साधला.
महायुती म्हणून निवडणुकीस सामोरे जाताना विद्यमान आमदार म्हणून सदरची जागा राष्ट्रवादीच्या गोटात गणली जाते. आपल्याला मतदारसंघात गुंतवून ठेवण्यासाठी विरोधी पक्ष, काका अजित पवार किंवा कोणी पवार कुटुंबातील सदस्य विधानसभेला आपल्या विरोधात उतरविला जाईल,
असे सूतोवाच दोन दिवसांपूर्वीच रोहित पवार यांनी केले होते. त्यानंतर रविवारी सकाळीच उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र जय पवार यांनी कर्जतचा गोपनीय दौरा पार पाडला.
नितेश राणेही कर्जतमध्ये
कापरेवाडी वेस येथील हनुमान मंदिराजवळ व सिध्दटेक येथे सिध्दी विनायकाच्या मंदिराच्या बाहेर मुस्लिम धर्मीयांकडून होत असलेल्या अतिक्रमणांविरुद्ध कर्जत येथे सकल हिंदू समाजाच्या वतीने भव्य हिंदू जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी नितेश राणे उपस्थित होते.
भल्याभल्यांना अंगावर घेण्यास तयार
माझ्या विरोधात कोणीही उभा राहा. मी भल्याभल्यांना अंगावर घेण्यास तयार आहे. जय पवार व नितेश राणे दोघेही एकाच दिवशी कर्जतमध्ये आले आहेत. राणे माझ्याविरोधात बोलण्याची शक्यता आहे, असे आमदार रोहित पवार म्हणाले होते.