Ahmednagar Politics : पावसाळा सुरू झाल्यानंतर निळवंडे धरणाच्या पाण्याच्या दुष्काळी भागातील शेतकरी बांधवांना उपयोग होणार नाही. त्यामुळे तातडीने दुष्काळी भागाला पाणी द्यावे. भंडारदरा आणि निळवंडे या दोन्ही धरणांमध्ये पाणी असतानाही लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना त्याचा फायदा होत नाही.
त्यामुळे जनतेच्या मनात सरकारबद्दल प्रचंड रोष आहे. आधी दुष्काळी भागाला पाणी द्यावे, सवडीनुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बोलवावे. उद्घाटनाचा मोठा कार्यक्रम करावा, त्याला आमची अजिबात हरकत नाही. असे पत्र माजी मंत्री, आमदार बाळासाहेब थोरात यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले.
निळवंडे धरणाच्या उजव्या कालव्याचे काम महिनाभरात पूर्णत्वाला जाते आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निळवंडे धरणासह कॅनॉलच्या उद्घाटनाचे निमंत्रण दिले आहे. असे महसूलमंत्री तथा अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी संगमनेर तालुक्यातील डिग्रस गावात बुधवारी (दि. १७) आयोजित कार्यक्रमात सांगितले होते.
त्यानंतर आता आमदार थोरात यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र दिले आहे . पत्रात म्हटले आहे, उत्तर अहमदनगर जिल्ह्यातील दुष्काळी भागातील १८२ गावांना वरदान ठरणारे निळवंडे धरण पूर्ण झाले. कालव्यांची कामे अनेक अडचणींवर मात करून पूर्ण केली.
मात्र, केवळ श्रेयवादासाठी दुष्काळी जनतेला वेठीस धरले जात आहे. नवीन कालव्यातून दुष्काळी भागातील जनतेच्या हक्काचे पाणी तातडीने सोडा. दुष्काळी भागाला नजरेसमोर ठेवून निळवंडे धरण आणि कालव्यांचे काम करण्यात आले आहे.
सध्या निळवंडे व भंडारदरा धरणातून किमान दहा टीएमसी पाणी आपण दुष्काळी भागाला देऊ शकतो. मात्र केवळ पंतप्रधान नरेद्र मोदी यांची उद्घाटनासाठी वेळ मिळत नाही म्हणून या हक्काच्या पाण्यापासून दुष्काळी भागातील जनता वंचित राहिली असल्याचे पत्रात म्हटले आहे.