अहमदनगर जिल्ह्यात सध्या दक्षिणेत खा. सुजय विखे हे साखर व डाळ वाटप करत आहेत. विविध तालुक्यांत हा कार्यक्रम सुरु आहे. दरम्यान हा कार्यक्रम आ. रोहित पवार यांच्या मतदार संघात कर्जत तालुक्यातही हा कार्यक्रम पार पडला. परंतु हा कार्यक्रम विखे यांनी लवकर आटोपता घेतला.
विखे यांच्या या कार्यक्रमाला भाजपचेच आमदार प्रा. राम शिंदे हे अनुपस्थित असल्याने चर्चांना उधाण आले होते. वेळ कमी असल्याने व उन्हात जनता बसली असल्याने हा कार्यक्रम लवकर आटोपता घेण्यात आला. खासदार सुजय विखे यावेळी म्हणाले, प्रभू श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा हा ऐतिहासिक सोहळा असून हा संपूर्ण देशवासीयांचा सोहळा आहे.
आज वेळ कमी आहेच शिवाय जनता उन्हात बसलेली आहे. त्यामुळे व्यासपीठावरील लोकांनी भाषण न केल्याने साखर गोड लागेल अन्यथा भाषणात वेळ गेला असता तर रोषास सामोरे जावे लागते असे सुजय विखे यांनी यावेळी म्हटले. त्याचप्रमाणे प्रभू श्रीरामांचा हा सोहळा सर्वांनी मोठ्या जल्लोषात साजरा केला पाहिजे.
याच पार्श्वभूमीवर साखर आणि डाळ वाटप आपण करत असून प्रत्येकाने याचे दोन लाडू बनवून प्रभू श्रीरामाच्या चरणी अर्पण केले पाहिजेत. जे लाडू करणार नाहीत त्यांचा बंदोबस्त करावा असे आपण प्रभू रामांना आपण सांगणार आहोत असा मिश्किल टोलाही त्यांनी हाणला.
विखे यांच्या कार्यक्रमात चर्चा राम शिंदे यांची :- या कार्यक्रमाच्या वेळी जिल्हा बँकेचे संचालक अंबादास पिसाळ, दादासाहेब सोनमाळी, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती काकासाहेब तापकीर आदी नेते उपस्थित तर होतेच परंतु चर्चा होती ती अनुपस्थित असणाऱ्या आ. राम शिंदे यांची. विखे-शिंदे यांच्यातील राजकीय युद्ध सर्वांनाच माहित आहे.
शिंदे यांनी याबाबत उघड उघड नाराजगीही व्यक्त केली आहे. त्यात आता खासदार सुजय विखे हे कर्जत मतदारसंघात दिवसभर उपस्थित असताना देखील आमदार राम शिंदे मात्र कार्यक्रमास कुठेच न दिसल्याने चर्चांना ऊत येणे साहजिकच होते. त्यामुळे राम शिंदे यांची अनुपस्थिती व वेळ व उन्हामुळे लवकर आटोपता घेण्यात आलेला कार्यक्रम यामुळे नागरिकांत विविध चर्चा सुरु होत्या.