Ahmednagar Politics : नेवासा विधानसभा मतदारसंघ हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा हक्काचा व पारंपारिक मतदार संघ आहे. आगामी विधानसभा निवडणूकीत नेवासा विधानसभा मतदार संघातून आपण पूर्ण ताकदीनिशी निवडणूक लढणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते अब्दुल शेख यांनी जाहीर केले.
त्यामुळे महायुतीचा घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादीने नेवाश्याच्या जागेवर आपला हक्क सांगितल्याने तालुक्यातील राजकीय गणिते बदलली आहे.
याबाबत आयोजित पत्रकार परिषदेत राष्ट्रवादीचे युवा नेते अब्दुल शेख म्हणाले की, नेवासा मतदारसंघ हा राष्ट्रवादी काँग्रेसचा पारंपारिक मतदार संघ आहे. या मतदारसंघात राष्ट्रवादीचे पार्टी नेहमीच जड ठरलेले आहे.
पक्षाकडून पक्षाचे नेते माजी आमदार नरेंद्र पाटील घुले, माजी आमदार पांडुरंग अभंग, माजी आमदार चंद्रशेखर घुले पाटील व आमदार शंकरराव गडाख या बलाढ्य नेतृत्वाने या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले आहे.
नेवासा तालुका हा नेहमीच राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जायचा. मात्र सध्याची परिस्थिती पाहता उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष युती सरकारमध्ये सहभागी झाल्यानंतर
नेवासा विधानसभा मतदारसंघाच्या जागेवर युतीच्या वतीने हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पारंपारिक मतदारसंघ असल्याने आपण उमेदवारीसाठी दावा केला असून पक्षाध्यक्ष ना. अजित पवार यांच्या आदेशाने व महायुतीतीलघटक पक्षाच्या सहकाऱ्याने आपण नेवासा विधानसभा लढवणार आहे.
नेवासा तालुक्यात बेरोजगारीचा प्रश्न मोठ्या प्रमाणात भेडसावत असून आपण ना. अजित पवार यांच्या माध्यमातून घोडेगाव एमआयडीसी सक्षम करण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. महायुती सरकारने शेतकरी हिताच्या दृष्टीने अनेक क्रांतिकारक निर्णय घेतले
असून महिलांसाठी लाडकी बहीण योजना, लाखो युवक युवतींसाठी बेरोजगार मेळाव्याच्या माध्यमातून विविध कंपन्यांत रोजगार मिळून दिला. हेच कार्य पुढे वाढविण्यासाठी आपण नेवासा मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचे युवा नेते अब्दुल हाफिज शेख यांनी सांगितले.