अहमदनगर Live24 टीम, 12 फेब्रुवारी 2022 :- पाथर्डी शहरातील पोलीस स्टेशनबाहेर पोलिसांच्याच मदतीने चोरी केल्याची घटना शुक्रवारी पहाटेच्या सुमारास घडली आहे. या संदर्भात पोलीस नाईक ईश्वर रघुनाथ गर्जे यांनी आज संध्याकाळी पाथर्डी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, पोलीस नाईक ईश्वर रघुनाथ गर्जे हे गुरुवारी रात्री पाथर्डी पोलीस स्टेशनला कर्तव्यावर ठाणे अंमलदार म्हणून हजर होते.
शुक्रवारी पहाटे ४:३० च्या सुमारास गर्जे यांना पोलीस ठाण्याच्या आवारातून इंजिन चालू असल्याचा आवाज आला. आवाजच्या दिशेने गर्जे हे पोलीस कॉन्स्टेबल किरण बडे यांच्यासोबत बाहेर आले असता, पोलीस स्टेशनबाहेर जप्त केलेल्या टँकर जवळ पोलीस नाईक दीपक शेंडे हे दारू पिलेल्या अवस्थेत उभे होते.
गर्जे हे पुढे गेले असता त्यांना जप्त केलेल्या टँकर मधून पेट्रोलवर चालणाऱ्या इंजिनद्वारे काळ्या निळ्या रंगाच्या एम.एच १४ एएच ६४६८ या टँकर मध्ये ३ इसम ऑइल डिझेल इंधन भरताना दिसले.
हे पाहून गर्जे यांनी पोलीस निरीक्षक सुहास चव्हाण यांना या घटनेची फोन करून माहिती दिली. या घटनेतील आरोपी भागवत काशिनाथ चेमटे (रा. शिंगोरी ता. शेवगाव), असिफ रफिक शेख (रा. पाथर्डी) व दीपक आरोळे (पूर्ण नाव माहित नाही) यांना गर्जे यांनी पाहिले असता, आरोपी असिफ व दीपक यांनी अंधारात पळ काढला.
तर आरोपी भागवत यास पोलीस कॉन्स्टेबल बडे यांनी पळ काढत असताना रंगेहात पकडले. तसेच पुढे आरोपींनी गर्जे आणि बडे यांना धक्केबाजी करत आरोपी भागवत याची सुटका करून पळून गेले. तसेच आरोपींना मदत करणारे पोलीस नाईक शेंडे हे मदत न करता पोलीस ठाण्यात निघून गेले.
पोलीस निरीक्षक चव्हाण हे पाथर्डी पोलीस ठाण्यात पोहचले असता, त्यांनी पोलीस नाईक शेंडे यांची विचारपूस करून आरोपींचे नाव बाहेर काढले. या नंतर पोलीस कॉन्स्टेबल भगवान सानप यांनी आरोपी भागवत याची गोपनीय बातमीदारातर्फत माहिती घेऊन त्यास अटक केले व पोलीस ठाण्यात हजर केले.
आरोपी भागवत याची विचारपुस केली असता आरोपीने दिलेली माहिती अशी की, विष्णु बाबासाहेब ढाकणे (रा.टाकळी मानुर) यांच्या सांगण्यावरून आरोपी भागवत, असिफ आणि दीपक यांनी पोलीस नाईक यांच्या मदतीने पोलीस स्टेशन आवारातील जप्त केलेल्या टँकर मधून डिझेल चोरी केली आहे.
तसेच आरोपी भागवतने ‘तू माझ्यावर कसा गुन्हा दाखल करतो, ते मी पाहतो तसेच गुन्हा दाखल केला तर तू पाथर्डी मध्ये कशी नोकरी करतो हे पाहतो मी’ असे बोलत पोलीस निरीक्षक चव्हाण यांना धमकी दिली आहे. या संदर्भात आरोपी विष्णु बाबासाहेब ढाकणे यांच्या सांगण्यावरून आरोपी भागवत काशिनाथ चेमटे,
असिफ रफिक शेख व दीपक आरोळे यांनी बेकादेशीर रित्या डिझेल चोरून विकण्याच्या उद्देशाने, तसेच सरकारी कामात अडथळा निर्माण केला व धक्काबुक्की केल्या प्रकरणी पाथर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तसेच आरोपींना मदत करणारे पोलीस नाईक दीपक अशोक शेंडे यांच्या विरोधात पाथर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.