अहमदनगर Live24 टीम, 25 फेब्रुवारी 2022 :- सध्या भुरट्या चोरट्यांनी नागरिकांना रस्त्याने प्रवास करणे देखील अवघड केले आहे. नुकतीच गतिरोधकाजवळ मोपेड गाडीचा वेग कमी झाल्याचा फायदा घेऊन चोरट्यांनी मोपेड वर मागे बसलेल्या एका महिलेच्या गळ्यातील दागिने ओरबडल्याची घटना सायंकाळी केडगाव परिसरात नगर – पुणे महामार्गावर घडली आहे.
या प्रकरणी अज्ञात चोरट्या विरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी, पुष्पा विजय शिंदे (वय ५१, रा. दत्त मंदिराजवळ, केडगाव) यांनी याबाबत बुधवारी कोतवाली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पुष्पा शिंदे या त्यांच्या पतीसोबत नगर-पुणे रोडवरून मोपेड गाडीवरून जात होत्या. अंबिकानगर बसस्थानकासमोर गतिरोधक आल्याने फिर्यादीच्या पतीने गाडीचा वेग कमी केला.
दरम्यान पाठीमागून मोटारसायकलवरून दोघे जण आले. त्यांच्यापैकी पाठीमागे बसलेल्या चोरट्याने फिर्यादी पुष्पा यांच्या गळ्यातील मिनी गंठण ओढले. त्यामुळे गंठण तुटले.
मिनी गंठणची एका बाजूची पट्टी चोरट्याच्या हाती लागली. सुमारे ६० हजार रुपये किमतीचे गंठण चोरट्यांनी लांबविले. याप्रकरणी अज्ञात चोरट्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.