अहमदनगर Live24 टीम, 08 जानेवारी 2022 :- नुकतीच पाथर्डी तालुक्यातील आंदोलन करणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांनी एकतर आम्हाला राज्य सरकारमध्ये विलिनीकरण करा अन्यथा स्वेच्छामरणाची परवानगी द्या.
अशी मागणी मुख्यमंत्र्यांना निवेदनाद्वारे केली होती. आता हीच मागणी नगरच्या तारकपूर आगारातील कर्मचाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. जिल्हाधिकारी यांना याबाबतचे निवेदन देण्यात आले आहे. हे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना देण्याची विनंतीही त्यांनी केली.
विलिनीकरणाच्या मागणीसाठी हताश झालेल्या एसटी कर्मचाऱ्यांनी आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या. आम्ही आता पूर्णपणे वैतागलो आहोत. आमची मानसिक स्थिती खराब झाली असून, आता अंत पहायला लावू नये.
एक तर राज्य सरकारमध्ये तत्काळ विलिनीकरण करा अन्यथा स्वेच्छा मरणाची परवानगी द्या, अशी तीव्र भावना कर्मचाऱ्यांनी निवेदनाद्वारे व्यक्त केली आहे.
मुळात एसटी कर्मचाऱ्यांचे पगार तुटपुंजे आहे. तुटपुंज्या पगारामुळे कुटूंब चालविताना तारेवरची कसरत करावी लागत आहे.
विलिनीकरणाच्या मागणीसाठी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरुच असून, आतापर्यंत ६५ एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. आत्महत्या करणे हा कायद्याने गुन्हा जरुर आहे, मात्र स्वेच्छा मरणाची परवानगी द्या, याबाबत आमच्यावर कोणाचाही दबाव नाही. आम्ही स्वखुशीने ही मागणी करत असल्याचे निवेदनात म्हटले आहे.