अहमदनगर Live24 टीम, 23 जानेवारी 2022 :- करमाळा येथील बंधन बँक शाखेतील घोटाळ्याप्रकरणी करमाळा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल असलेला आरोपी अजित लाला जगताप याला कर्जत पोलिसांनी जेरबंद केले आहे.
त्याच्यावर २ कोटी १० लाखांची फसवणूक केल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती. कर्जत पोलिसांनी या आरोपीस करमाळा पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.
याबाबतची अधिक माहिती अशी, करमाळा येथील बंधन बँक शाखेतील घोटाळ्याप्रकरणी करमाळा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल असलेला आरोपी अजित लाला जगताप (वय २८ वर्षे, रा. राशीन ता. कर्जत) हा पोलिसांना हवा होता.
त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा घडल्यापासून तो फरार होता. रात्री गस्तीवरील पोलीस पथकाला तो मिळून आला. कर्जत पोलिसांनी तात्काळ करमाळा पोलिसांना संपर्क करून त्यांच्या ताब्यात दिला.
गुन्हा हा गंभीर स्वरूपाचा तसेच मोठ्या रकमेचा असल्याने या गुन्ह्याचा तपास उपविभागीय अधिकारी आर्थिक गुन्हे शाखा सोलापूर ग्रामीण यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.
ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, करमाळ्याचे पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे पोलीस अंमलदार पांडुरंग भांडवलकर, नितीन नरोटे, अमित बरडे, अण्णासाहेब चव्हाण यांनी केली आहे.