अहमदनगर Live24 टीम, 26 फेब्रुवारी 2022 :- दिवसेंदिवस नगर तालुक्यात गावागावांमध्ये चोरट्यांचा धुमाकूळ वाढत चालला आहे. एकाच दिवशी ४ ते ५ ठिकाणी चोऱ्या झाल्याची घटना ताजी असताना काल भरदिवसा एका शेतकऱ्याचे घर फोडून सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम असा एकूण २ लाख ३२ हजार६०० रूपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केल्याची घटना नगर तालुक्यातील चास गावाच्या शिवारात घडली.
नगर तालुक्यात ग्रामीण भागात सध्या शेतीची कामे सुरू असल्याने शेतकरी घराला कुलूप लावून कुटूंबासह शेतात कामाला गेल्यावर बंद घर फोडून चोऱ्या करण्याचे प्रमाण वाढले आहे.
दोन दिवसांपूर्वीच राळेगणसिध्दी येथे भरदिवसा शेतकऱ्याचे घर फोडून रोकड अज्ञात लांबविली होती. तीच चोरीची पध्दत वापरत चास गावच्या शिवारात घुंगार्डे वस्तीवर राहणाऱ्या
आनंदा बबन घुंगार्डे या शेतकऱ्याच्या बंद घराच्या पाठीमागील दरवाजाची कडी उचकटून घरात प्रवेश करत अज्ञात चोरट्यांनी घरातील कपाटात ठेवलेले दोन लाख ३२ हजार ६०० रूपये किंमतीचे सोन्या-चांदीचे दागिणे व रोख रक्कम चोरून नेली.
घुंगार्डे व त्यांचे कुटुंबिय या काळात शेतात कामासाठी गेलेले होते. चोरीची घटना निदर्शनास आल्यानंतर त्यांनी नगर तालुका पोलिसांना माहिती दिली.