Ahmednagar News : चौंडी येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीदिनी (३१ मे) रोजी माजी आमदार अनिल गोंटे यांच्या भाषणावर आक्षेप घेण्यात आला आहे.
गोंटे यांनी आपल्या भाषणात राजमाता आणि महाराणींचा अवमान केल्याचा आरोप करण्यात येत आहे. याचा निषेध करण्यासाठी आज गुरूवारी दुपारी जामखेड येथील खर्डा चौकात अहिल्याप्रेमी आणि शिवप्रेमींच्या वतीने निदर्शने करण्यात येणार आहेत.
याआधी त्याच ठिकाणी पोलिसांनी अडविल्यानंतर पवार कुटुंबियांवर टीका करताना जातीय तेढ निर्माण केल्याच्या आरोपावरून भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
त्यानंतर आता गोंटे यांच्या वक्तव्याला आक्षेप घेण्यात येत आहे. या कार्यक्रमात पवार यांच्या आधी गोंटे यांचे भाषण झाले. त्यांनी अहिल्यादेवींचा उल्लेख राजमाता किंवा महाराणी असा न करता पुण्यश्लोक असा करावा, अशी सूचना मांडली.
मात्र ही सूचना करताना त्यांची जीभ घसरली. राजामाता पायलीच्या पन्नास पडल्या आहेत आणि महाराणी फुटाफुटावर आहेत, असे वक्तव्य त्यांनी केले. यावेळी त्यांच्या या वक्तव्याला कोणीही हरकत घेतली नव्हती. आता मात्र हा मुद्दा गाजू लागला आहे.