अहमदनगर Live24 टीम, 23 जानेवारी 2022 :- जिल्ह्यातील राजकारण सध्या चांगलेच ढवळून निघत आहे. निवडणुकीचा धुराळा उडाला असून आता सत्ता स्थापनेसाठी पारनेरात मोठ्या राजकीय हालचाली सुरु आहे.
यातच पारनेर नगर पंचायतमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने बहुमताचा आकडा पार केला आहे. तिसरा अपक्ष नगरसेवक योगेश मते यांनी आ. नीलेश लंके यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केल्याने शहरविकास आघाडीसह राष्ट्रवादीचे संख्याबळ दहावर पोहचले आहे.
यामुळे सत्ता स्थापनेचा राष्ट्रवादीचा मार्ग मोकळा झाला आहे. प्रभाग तीन मधील अपक्ष उमेदवार मते यांनी राष्ट्रवादीसोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयाकडे राष्ट्रवादीच्या अगोदरच नऊ नगरसेवकांची गट नोंदणी झालेली आहे. तर आता दोन दिवसांत राष्ट्रवादीचे संख्याबळ 10 वर गेले आहे.
नगर पंचायत निवडणुकीनंतर आ. लंके, तसेच मते यांच्यात चर्चा होऊन विकासाच्या मुद्यावर राष्ट्रवादी पक्षाला साथ देण्याचा निर्णय मते यांनी घेतल्याचे ते सांगत आहेत.
मते यानी प्रभागातील विकास कामांच्या आश्वासनांवर राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केल्याचे सांगितले जात आहे. त्यांच्या प्रभागातील महाजन मळ्यास जोडणारा 600 मिटरचा रस्ता, तसेच लोणी रस्ता ते ठोंबरे वस्ती हा सव्वा किलोमिटरचा रस्ता मते यांनी आ. लंके यांच्याकडून मंजूर करून घेतला.