Ahmednagar News : रेखा जरे हत्याकांड प्रकरणातील आरोपी बाळ बोठे याची रवानगी नाशिक मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली असल्याची पोलीस उपअधीक्षक अजित पाटील यांनी सांगितले.
पारनेर येथील उपकारागृहामध्ये क्षमतेपेक्षा जास्त कैद्यांची संख्या झाल्यामुळे 20 कैद्यांची रवानगी प्रत्येकी 10 याप्रमाणे नाशिक आणि औरंगाबाद येथील मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली आहे. यामध्ये बोठे याला नाशिक मध्यवर्ती कारागृहात पाठविण्यात आले आहे.
पारनेर उपकारागृहाची 24 कैद्यांची क्षमता आहे. मात्र प्रत्येक्षात याठिकाणी 70 कैदी ठेवण्यात आले होते. हे प्रमाण जास्त झाल्याने जुन्या गुन्ह्यातील कैदी अन्य ठिकाणी रवाना करण्याची कायदेशीर प्रक्रिया पार पाडण्यात आली.
त्यानुसार औरंगाबाद मध्यवर्ती कारागृहात 10 तर नाशिक येथील मध्यवर्ती कारागृहात 10 असे 20 कैद्यांची रवानगी करण्यात आली आहे. तरीही याठिकाणी सुमारे 50 कैदी असल्याचे उपअधीक्षक पाटील यांनी सांगितले.
दरम्यान रेखा जरे हत्याकांड प्रकरणी बाळ बोठे कारागृहात आहे. त्याच्याविरूध्द न्यायालयात दोषारोपपत्र दाखल झाले आहे. त्याला उच्च न्यायालयाने जामीन नामंजूर केला आहे. तसेच कोतवाली पोलिसांत दाखल असलेल्या विनयभंगाच्या गुन्ह्यात देखील त्याला उच्च न्यायालयाने जामीन नामंजूर केला आहे. आता त्याची रवानगी नाशिक येथील मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली आहे.