अहमदनगर Live24 टीम, 05 जानेवारी 2022 :- पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वरमधील केंद्रीय जवाहर नवोदय विद्यालयातील गेल्या 12 दिवसांपासून विलगीकरण केलेल्या 226 मुलांना घरी सोडण्यात आले.
दरम्यान नवोदयमध्ये कोरोना बाधित विद्यार्थी आढळून आल्यानंतर गेल्या आठवड्यापासून पालक चिंतातूर होते. यामुळे तालुक्यात देखील खळबळ उडाली होती.
दररोज बाधित मुले आढळत असल्याने पालकांनी मुलांना घरी सोडण्याची मागणी केली होती. यातील 310 मुलांचे विलगीकरण करण्यात आले होते.
मुलांना आम्ही विलगीकरणात ठेऊ. प्रशासन त्यांची काळजी घेत नाही, असेही आरोप त्यावेळी पालकांकडून करण्यात आले.
मात्र, प्रशासनाने मुलांची योग्यरीत्या काळजी घेत विलगीकरण कक्षाची पाणी पिण्याची स्वतंत्र व्यवस्थेसह इतर बाबींची लक्षपूर्वक काळजी घेतली.
कोविडमधील कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर मुलांना सोडण्यात आले. पालकांनादेखील वेळोवेळी याची माहिती देण्यात आली. त्यामुळे हा संसर्ग इतर ठिकाणी वाढला नाही.
यातील दहावी व बारावीतील मुलांची कोविड चाचणीसह विलगीकरणातील दिवस संपले असल्याने त्यांचे वर्ग सुरू करण्यात येणार आहेत.
विलगीकरणातील मुले ही घरून परत विद्यालयात आल्यानंतर त्यांची कोविड चाचणी करूनच आत प्रवेश दिला जाणार आहे. पारनेर ग्रामीण रुग्णालयातील एकूण 45 मुलांना घरी सोडण्यात आले आहे. उर्वरित 38 मुलांना लवकरच सोडण्यात येणार आहे.