Good News : पारनेर तालुका कृषी अधिकाऱ्यांना घेराव घालत विमा कंपनीला जाब विचारणाऱ्या विश्वनाथ कोरडे यांच्या प्रयत्नांना अखेर यश आले असून, तालुक्यातील ३५५२३ शेतकऱ्यांच्या खात्यावर प्रधानमंत्री पिक विमा योजना २०२३ च्या खरीप हंगामातील सोयाबीन पिकाची अधिसूचना मान्य करत १६.०५ कोटी रुपये अग्रीम रक्कम विमा कंपनीमार्फत लवकरात लवकर वितरीत होणार असल्याची माहिती विश्वनाथ कोरडे यांनी दिली.
शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्ती, किड रोग, यासारख्या प्रतिकुल परिस्थितीमुळे होणाऱ्या नुकसानीपासून संरक्षण देण्यासाठी शासनाच्या वतीने १ रुपयात राबविण्यात येत असलेल्या प्रधानमंत्री पिकविमा योजना राबवण्यात येते.
तालुक्यात पडलेला पावसाचा खंड व अत्यल्प स्वरुपातील पाऊस, यामुळे शेतकऱ्यांना पीकविम्याची रक्कम मिळावी, यासाठी कोरडे यांनी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील व खा. डॉ. सुजय विखे पाटील तसेच विमा कंपनी, कृषी विभागाकडेन पत्रव्यवहार केला होता.
महसूलमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिलेल्या सुचना व आढावा बैठकीत दिलेल्या निर्देशानुसार मध्य हंगाम प्रतिकुल परिस्थिती अंतर्गत जिल्हा प्रशासनामार्फत कार्यवाही करण्यात आली असून, पारनेर तालुका व संगमनेर तालुक्यातील निमोण महसुल मंडळातील शेतकऱ्यांना प्रलंबित असलेल्या सोयाबीन व मका पिकाच्या अग्रीम रकमेचे वाटप होणार असल्याचेही कोरडे यांनी सांगितले.
यासाठी खा. विखे पाटील यांचे मोलाचे सहकार्य व मार्गदर्शन लाभले. शेतकऱ्यांच्या वतीने विश्वनाथ कोरडे, मा. सभापती काशिनाथ दाते सर, भाजपा तालुकाध्यक्ष राहुल पाटील शिंदे, शिवसेनेचे तालुकाप्रमुख विकास रोहकले, जनसेवा फाउंडेशनचे अध्यक्ष सचिन पाटील वराळ, डॉ. भाऊसाहेब खिलारी यांनी ना. विखे व खा. विखे यांचे आभार मानले आहे.