पारनेर

मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या आंदोलनास पाठिंबा – आमदार नीलेश लंके

Ahmednagar News : मराठा समाजास आरक्षण देण्याच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी शुक्रवारी आमदार नीलेश लंके यांनीही मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांना तसेच तहसीलदारांना पत्र देत या आंदोलनास आपला पाठिंबा जाहीर केला आहे.

निवेदनात म्हटले आहे की, मराठा समाजाच्या आरक्षणासाठी गेल्या अनेक वर्षांपासून महाराष्ट्रात वेगवेगळी आंदोलने, उपोषण होत आहे. जालना जिल्ह्यातील आंतरवली सराटी या गावात गेली काही दिवस मनोज जरांगे यांनी उपोषण केले होते. त्यावेळी सरकारने त्यांच्याशी चर्चा केली होती.

त्यावेळी जरांगे यांनी सरकरला चाळीस दिवस मुदत दिली होती; परंतु आता ही मुदत संपली तरी दिलेले आश्वासन पूर्ण करण्यात आलेले नाही, त्यामुळे आंतरवली सराटी येथे जरांगे यांनी पुन्हा उपोषण सुरू केले आहे. त्याच बरोबर राज्यातील अनेक ठिकाणी मराठा बांधव आंदोलन, उपोषण, साखळी उपोषणास बसले आहेत.

सकल मराठा समाजाच्या वतीने मराठा बांधव पारनेर तहसील कार्यालयासमोर उपोषणास बसले आहेत. सकल मराठा समाजाची मागणी रास्त असून, या मागणीस माझा जाहीर पाठिंबा असल्याचे आ. लंके यांनी दिलेल्या पत्रात म्हटले आहे.

राज्यभर सुरू असलेल्या मराठा समाजाच्या आंदोलनास माझा पाठिंबा असल्याचे नमूद करतानाच पारनेर येथील आंदोलनास आपण प्रत्यक्ष उपस्थित राहणे गरजेचे होते; परंतू गेली दोन दिवस मुंबई येथे कामानिमित्त असल्याने प्रत्यक्ष उपस्थित राहू न शकल्याबद्दल आ. लंके यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे.

मराठा बांधवांच्या मागणीचा विचार करून मराठा आरक्षणासाठी सुरू असलेले आंदोलन व उपोषणाची शासन दरबारी तत्काळ दखल घेण्याची मागणी आ. लंके यांनी तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात केली आहे.

या वेळी पारनेरचे नगराध्यक्ष नितीन आडसुळ, रा. या. औटी, राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष अर्जुन भालेकर, संदीप चौधरी, महेंद्र गायकवाड, जितेश सरडे, योगेश मते, डॉ. बाळासाहेब कावरे, भूषण शेलार, अनिल शिंदे, दत्ता ठाणगे, रायभान औटी, तुषार सोनावळे आदी उपस्थित होते.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts