अहमदनगर Live24 टीम, 03 मार्च 2022 :- राहुरी तालुक्यातील टाकळीमिया येथील ग्रामसभेत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सोबतच डॉ.बाबासाहेब आंबेडकर, अण्णाभाऊ साठे व महात्मा ज्योतिबा फुले यांचे स्मारक व्हावे असा मुद्दा मांडणाऱ्या महिलेचा विनयभंग करून
तिला मारहाण केल्याप्रकरणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवींद्र मोरे यांच्यासह ५ लोकांविरुद्ध विनयभंग व मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
३१ वर्षीय महिलेने दिलेल्या फिर्यादीत म्हंटले की, २ मार्च रोजी सकाळी १०.३० च्या सुमारास आमचे टाकळीमिया गावात विठ्ठल रुक्मीणी मंदीराचे समोर ग्रामसभा असल्याने सदर ठिकाणी मी गावची नागरीक नात्याने गेले होते.
त्या ठिकाणी ग्रामसभेत शिवाजी महाराजांचे स्मारक व्हावे यास आमची देखील संमती असुन त्यासोबतच डॉ. बाबासाहेब आंबेडकर, आण्णाभाऊ साठे, महात्मा ज्योतीबा फुले यांचे देखील स्मारक व्हावे असा मुद्दा मांडत असताना रविंद्र बापुराव मोरे यास मी मांडलेल्या मुद्दयाचा राग आल्याने त्याने भरसभेत माझ्या अंगावर येवून त्याने माझी गचांडी धरून मला शिवीगाळ करणेस सुरवात कर माझा पदर ओढुन मला लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले.
तसेच तेथे उपस्थीत असलेल्या सचिन भाऊसाहेब कर्पे याने उर्मट भाषा वापरून माझ्या डोक्यात चापट मारली. सुरेश ज्ञानदेव तोडमल याने माझ्या पाठीत चापट मारली तर उमेश रावसाहेब कवाने, बाळासाहेब शिंदे (सर्व रा. टाकळीमिया ता.राहुरी ) यांनी हात धरुन मला ओढुन शिवीगाळ करून लाथाबुक्कयाने मारहाण करून तु पुन्हा आमचे नादी लागलीस तर तुझा काटा काढू अशी धमकी दिली.
त्यावेळी रवि मोरे यांनी माझ्या गळ्यातील सोन्याचे मिनिंगठन ओडुन तोडल्याने गहाळ झाले असल्याचे फिर्यादीत म्हंटले आहे. दरम्यान याबाबत राहुरी पोलीस ठाण्यात रविंद्र बापुराव मोरे, सचिन भाऊसाहेब कर्पे, सुरेश ज्ञानदेव तोडमल, उमेश रावसाहेब कवाने, बाळासाहेब शिंदे यांच्या विरोधात विनयभंग व मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
टाकळीमिया गावतील रवींद्र मोरे यांच्यासह ५ लोकांविरुद्ध खोटे गुन्हे दाखल केले आहे. ते गुन्हे रद्द व मागे घेण्यासाठी टाकळीमिया ग्रामस्थ व मराठा एकीकरण समितीच्यावतीने ३ मार्च रोजी सकाळी 10 वाजता राहुरी तहसील कार्यालय कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार असून हा शहरातील मोर्चा पाण्याच्या टाकी परिसरातून निघणार आहे.