राहुरी

Rahuri News : मराठा आरक्षणासाठी राहुरी तालुका सर्वत्र १०० टक्के बंद ठेवून सरकारचा निषेध

Rahuri News : मराठा आरक्षण त्वरीत मिळावे, या मागणीसाठी दिनांक ३० ऑक्टोबरपासून राहूरी येथे राहुरी तालुक्यातील सकल मराठा समाजाच्या वतीने साखळी उपोषण सुरु करण्यात आले आहे. या मागणीला समर्थन म्हणून ३१ ऑक्टोबर रोजी राहुरी तालुका सर्वत्र १०० टक्के बंद ठेवून सरकारचा निषेध करण्यात आला.

मराठा आरक्षण जाहीर होत नाही म्हणून गेल्या महिनाभरापासून मराठा समाज आक्रमक झाला आहे. याचाच एक भाग म्हणून मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा उपोषण सुरू केलेले आहे. या उपोषणाची अद्यापही सरकारने योग्य ती दखल न घेतल्याचा आरोप सकल मराठा समाजाने केलेला आहे.

त्यामुळे राहुरी तालुक्यातील अनेक गावांमध्ये ३० ऑक्टोबरपासून मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी उपोषणाचे हत्यार उपसले आहे. या उपोषणाला समर्थन देण्यासाठी दिनांक ३१ ऑक्टोबर रोजी संपूर्ण राहुरी तालुका १०० टक्के बंद पाळून सकल मराठा समाजाने शांततेच्या मार्गाने या आंदोलनास पाठिंबा दिला आहे.

दि. ३ नोव्हेंबरपर्यंत सरकारने दखल न घेतल्यास पुढे होणाऱ्या तीव्र आंदोलनास सरकार जबाबदार राहिल, असा इशारा राजेंद्र शेटे यांनी दिला. तसेच उपोषणाची दखल न घेतल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी सत्यवान पवार यांनी दिला.

मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी अंतरवाली येथे मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आमरण उपोषण सुरु केले आहे. त्या उपोषणाला पाठिंबा म्हणून दिनांक ३० ऑक्टोबरपासून राहुरी येथील तहसील कार्यालयासमोर सकल मराठा समाजाच्या वतीने साखळी उपोषण सुरु करण्यात आले.

या प्रसंगी राजेंद्र शेटे व सत्यवान पवार यांनी मनोगत व्यक्त केले. गेल्या ४० वर्षांपासून मराठा समाज आरक्षणासाठी लढा देत आहे. आजपर्यंत सत्तेवर आलेल्या प्रत्येक सरकारने मराठा समाजाची दिशाभूल करून आरक्षण देण्यास टाळाटाळ केली.

मराठा समाजाच्या वतीने आरक्षणासाठी लाखोंच्या संख्येने मोर्चे काढण्यात आले. अनेक तरुणांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. तरी देखील कोणत्याच सरकारने दखल घेतली नाही; मात्र आता आरक्षण घेतल्याशिवाय स्वस्त बसणार नाही, असा पवित्रा मराठा समाजाने घेतला आहे.

उपोषणस्थळी अनेक वक्त्यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सरकारचा निषेध करून आजी माजी आमदार, खासदार तसेच कोणत्याही राजकीय पक्षाच्या पुढाऱ्यांनी उपोषणाकडे फिरकू नये,

जोपर्यंत आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागत नाही, तोपर्यंत राजकीय पक्षाच्या पुढाऱ्यांना तालूका बंदी करण्यात आली असून यापूढे राजकीय पुढाऱ्यांनी रस्त्यावर फिरताना काळजी घ्यावी, असा इशारा आंदोलकांनी यावेळी दिला.

याप्रसंगी तालुक्यातील शेकडो कार्यकर्त्यांनी गटतट व राजकीय हेवे दावे बाजूला ठेवून एकत्रित लढा सुरु केला. अनेक पक्ष व संघटनाच्या कार्यकर्त्यांनी साखळी उपोषणास पाठिंबा दिला. यावेळी शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office
Tags: Rahuri News

Recent Posts