१ जानेवारी २०२५ राहुरी शहर : पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या नेतृत्वाखाली राहुरी पोलीस स्टेशनने वर्षभरात उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे.नंबर प्लेट नसणाऱ्या वाहनांविरोधात राबविलेल्या विशेष मोहिमेद्वारे केवळ वाहनचोरीचे प्रकार कमी करण्यात यश मिळाले नाही,तर वाहतूक शिस्तीचाही बडगा उगारण्यात आला आहे.त्याचा अपेक्षित परिणाम दिसून आला असून वाहन चोरट्यांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे.
पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर वर्षभरात ६५४ विना नंबर प्लेट वाहनांवर कारवाई करत ३ लाख ७३ हजार ३०० रुपयांचा दंड वसूल केला.३१ डिसेंबर २०२४ रोजी ५२ वाहनांवर कारवाई झाली असून,यातील ४८ वाहन चालकांना २८ हजार ८०० रुपये दंड आकारण्यात आला.उर्वरित गाड्यांची कागदपत्रे सादर न झाल्याने त्यांच्यावर तपास सुरू आहे.
राहुरी पोलिसांनी वाहतूक नियम उल्लंघनाच्या १ हजार ७०६ केसेस दाखल करत १० लाख ९० हजार ३०० रुपयांचा दंड वसूल केला आहे.नागरिकांमध्ये वाहतूक शिस्तीबाबत जागरूकता वाढवण्यासाठी हा उपक्रम महत्त्वाचा ठरला आहे.नवीन गाड्यांवर नंबर प्लेट न बसवता वाहन चालवणाऱ्या विरोधात किंवा चोरीच्या वाहनांचा वापर रोखण्यासाठी पोलिसांनी तपासणी मोहीम राबवली.
यामध्ये विना नंबर प्लेट गाड्यांचे मालकांना नंबर प्लेट लावण्यास प्रवृत्त करण्यात आले.शोरूममधून नंबर प्लेट न लावता वाहन रस्त्यावर आणल्यास आरटीओ च्या माध्यमातून संबंधितांवर कारवाई करण्याचीही सूचना देण्यात आली आहे.ही मोहिम पोलीस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, उपविभागीय पोलीस अधिकारी बसवराज शिवपुजे यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात आली.
पोलीस निरीक्षक ठेंगे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक धर्मराज पाटील, हेड कॉन्स्टेबल गीते, ठोंबरे आणि पोलीस कर्मचारी सतीश कुराडे, अंकुश भोसले, जालिंदर धायगुडे, होमगार्ड कर्मचारी यांनी उत्कृष्ट कामगिरी बजावली.राहुरी पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की,आपली वाहने क्रमांक प्लेटसह नोंदवावी,जेणेकरून चोरीच्या वाहनांचा शोध घेणे सुलभ होईल.तसेच, विना नंबर प्लेट वाहनांवर कारवाई टाळण्यासाठी वाहन चालकांनी वाहतूक नियमांचे पालन करावे.
तर वाहन चोरी कमी होतील
चोरीच्या वाहनांवर कारवाई करणे आणि विना नंबर प्लेट वाहनांवर तपासणी करणे हे खूप महत्त्वाचे आहे, जेणेकरून नागरिकांना सुरक्षिततेचा अनुभव मिळेल.पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या नेतृत्वाखाली राहुरी पोलिसांनी केलेली कार्यवाही इतर ठाण्यांसाठी प्रेरणादायक ठरली आहे.प्रत्येक पोलीस ठाण्याने स्थानिक परिस्थितीनुसार अशीच कार्यवाही सुरू केली, तर वाहन चोरीचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर कमी होईल आणि सार्वजनिक सुरक्षा सुनिश्चित होईल.
इतर पोलीस ठाण्यांनी आदर्श घ्यावा
राहुरी पोलीस ठाण्याने राबवलेल्या विना नंबर प्लेट वाहनांवर आणि चोरीच्या वाहनांवर कारवाईची मोहिम ही इतर पोलीस ठाण्यांसाठी एक आदर्श ठरली आहे. या मोहिमेद्वारे वाहन चोरीला आळा घालण्यात आणि वाहतूक शिस्त वाढवण्यात यश मिळाले आहे.जिल्ह्यातील इतर पोलीस ठाण्यांनी या उदाहरणाचा पाठपुरावा करावा आणि त्याच पद्धतीने कठोर कारवाई सुरू करावी.
दुचाकी चोरीला आळा
गेल्या काही वर्षात राहुरी तालुक्यात दुचाकी चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली होती. चोरीस गेलेल्या दुचाकी अल्प दरात विकून विना नंबर प्लेट वापरण्याच्या प्रकारांवर पोलीस निरीक्षक ठेंगे यांनी कठोर पाऊल उचलले. २०२३ च्या तुलनेत २०२४ मध्ये चोरीस गेलेल्या वाहनांची संख्या ४५ ने घटली, तर चोरीस गेलेल्या ५६ दुचाकी जप्त करण्यात आल्या.