अहमदनगर Live24 टीम, 09 फेब्रुवारी 2022 :- बंधूवरती प्रेम करताना त्याच्यासाठी ढाल बनून अहोरात्र उभा राहणारे दिवंगत नेते सदाशिव पाचपुते हे एक बंधुप्रेमाची मिसाल होते. त्यांनी कार्यकर्त्यांना प्रेम दिले.
कुटुंबाला आधार दिला. त्यांच्यासारखा भाऊ हे बबनराव पाचपुते यांच्या राजकारणाची संपत्ती होती. त्यांनी बंधुप्रेमाचा आदर्श घातला, असे उद्गार काढत रामराव ढोक यांनी सदाशिव पाचपुते यांना पुण्यस्मरणानिमित्त श्रद्धांजली अर्पित केली.
सदाशिव पाचपुते यांच्या पुण्यस्मरणाचा कार्यक्रम काष्टी येथील तुळसाईनगर येथे आयोजित करण्यात आला होता. याला सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी हजेरी लावली.
कार्यक्रमस्थळी माजी आमदार राहुल जगताप, जिल्हा बँकेच्या संचालिका अनुराधा नागवडे, जि. प. चे माजी अध्यक्ष बाबासाहेब भोस, अविनाश महाराज साळुंके यांची भाषणे झाली.
यावेळी माजी आमदार राहुल जगताप म्हणाले, कुठे विरोध करायचा आणि कुठे थांबायचे हे सदाशिव पाचपुतेंना ज्ञात होते. राजकारणापलीकडे जाऊन त्यांनी सर्वांशी संबंध जपले.
विरोधकांनाही मान दिला. त्यांच्या जाण्याने तालुक्याचे नेते बबनराव पाचपुते यांची फार मोठी हानी झाली आहे. त्यातून सावरण्याची त्यांच्या कुटुंबीयांना शक्ती मिळो.
सदाशिव पाचपुतेंमुळे पाचपुते गटाची यंत्रणा टिकून होती. पण आता ती जबाबदारी पेलवण्यासाठी साजन पाचपुतेंनी पुढे यायला हवे, असा सूर पाचपुते समर्थकांनी या कार्यक्रमा दरम्यान चर्चेत आणला.
पाचपुते कुटुंबात भविष्यातील चेहरा म्हणून कोणी सक्रिय व्हायचे याविषयी दुफळी आहे. ती बबनराव पाचपुते यांच्या बोलण्यातुन जाणवली.
कुटुंबातील वारस एकत्र ठेवण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत, असे ते बोलले. तेच बोल त्यांच्यातील दुफळीचे संकेत होते. पण बबनराव पाचपुते यांना सोडून गेलेले काही चेहरे साजन यांच्या नियोजनात पुढे दिसले.