Ahmednagar News : तालुक्यातील आखतवाडे शिवारात मोसंबीच्या बागेत लावलेली तब्बल ५ लाख ६५ हजार रुपयांची ११३ किलो वजनाची १२९ गांजाची झाडे शेवगाव पोलिस पथकाने छापा टाकून जप्त केली आहेत.
याप्रकरणी एका आरोपीस अटक केली आहे. याबाबत अधिक माहिती अशी, तालुक्यातील आखतवाडे शिवारात बोरलवण वस्तीवर गांजाच्या झाडांची लागवड केल्याची माहिती गुप्त बातमीदाराकडून पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे शेवगावचे परिविक्षाधीन सहा. पोलिस अधिक्षक बी.चंद्रकांत रेड्डी, पोलिस निरीक्षक विलास पुजारी, सपोनि विश्वास पावरा,
आशिष शेळके, पोना. उमेश गायकवाड, सुजीत सरोदे, पोकॉ. सुनिल रत्नपारखी, सचिन खेडकर, एकनाथ गर्कळ वैभव काळे, मपोकॉ रुपाली कलोर या पथकाने शनिवार दि.८ रोजी दुपारी २:३० वाजता तेथील गट नं. १५६ क्षेत्रात छापा मारला असता तेथे मोसंबीच्या बागेत गांजाची झाडे असल्याचे दिसुन आले.
पोलिसांनी ५ हजार रुपये प्रति किलोप्रमाणे ५ लाख ६५ हजार रुपयांची ११३ किलो वजनाची १२९ गांजाची झाडे जप्त केली असून, अरुण बाजीराव आठरे यास अटक केली आहे. या बाबत पो. हवालदार तुळशीराम नाकाडे यांनी फिर्याद दिली आहे.