अहमदनगर Live24 टीम, 05 ऑक्टोबर 2021 :- अहमदनगर जिल्ह्यातील विविध तालुक्यात नदीपात्रात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली.राहुरी, कोपरगाव, श्रीरामपूर, श्रीगोंदा या तालुक्यातील या घटनांमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
राहुरीत सख्खे भाऊ बुडाले, श्रीगोंद्यात ११ महिन्याची मुलगी गेली वाहून, श्रीरामपूरात पत्नीचा मृतदेह सापडला तर पतीच्या प्रेताची शोधशोध सुरू,कोपगावात मुलाला वाचविताना वडिलांचा मृत्यू.
श्रीगोंदा तालुक्यात मुलगी खेळता खेळता कॅनॉल मध्ये पडली
श्रीगोंदा तालुक्यात हंगेवाडी येथे रामा पवार यांची अंदाजे 11 महिन्यांची मुलगी खेळता खेळता कॅनॉल मध्ये पडली होती.तिचे प्रेत सापडले असल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
राहुरी शहरात पाच मुले बुडाली
राहुरी शहरातील गणपती घाट येथे आज दि.५ ऑक्टोबर रोजी दुपारी नदीमध्ये पोहण्यासाठी गेलेल्या पाच मुले बुडाली.
यातील दोन मुले पाण्याच्या प्रवाहात राहुल बाळू पगारे व सुमित बाळू पगारे सख्खे भाऊ वाहून गेले आहेत. तर अन्य तीनमुले सुरक्षित आहेत.वाहून गेलेल्या दोन सख्ख्या भावांचा शोध सुरू आहे.
श्रीरामपूर तालुक्यातील दोन जण पाण्यात तोल जाऊन पडले !
श्रीरामपूर तालुक्यातील मौजे माळेवाडी येथील अशोक बंधारा येथे आज सकाळी साडेबारा वाजेच्या सुमारास एकाच कुटुंबातील दोन जण मच्छीमारी करण्यासाठी गेले असताना पाण्यात तोल जाऊन पडल्यामुळे
मंजाबापू भागवत गायकवाड( वय 37 वर्ष)व चंद्रकला मंजाबापू गायकवाड (वय 30) वर्ष हे पाण्यात वाहून गेलेले असून चंद्रकला गायकवाड यांचे प्रेत सापडले असून अद्याप पर्यंत मंजाबापू यांचे प्रेत मिळून न आल्याने शोधकार्य सुरू आहे.
कोपरगावात मुलाला वाचविताना वडीलांसह लेकाचा मृत्यू
कोपरगाव तालुक्यातील मुर्शतपुर जवळील गांजावाडी जवळ असलेल्या मंडपी नाला येथे आज दि. 5 ऑक्टोबर रोजी दुपारी सुमारे 12 वाजेच्या सुमारास पाण्यात बुडालेल्या मुलाला वाचविताना वडीलांसह लेकाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे
तर त्यांच्यासोबत असलेले आणखी दोघे जण सुदैवाने सुखरूप वाचले आहे. या घटनेत वडील संजय मारुती मोरे (वय 35 वर्ष), मुलगा सचिन संजय मोरे (वय 15 वर्ष) रा. गांजा वाडी या दोघांचा मृत्यू झाला आहे.
तर ओम मोरे व शुभम योगेश पवार या दोघांना वाचविण्यात यश आले आहे. हे चौघे मंडपी नाला येथे गेले असता सचिन संजय मोरे हा पाण्यात बुडत असतांना त्याला वाचविण्यासाठी त्याच्या वडीलांसह त्यांच्या सोबत असलेल्या दोघांनी पाण्यात उडी मारली असल्याचे समजते.
सदर घटनास्थळी तहसीलदार विजय बोरुडे, कोपरगाव शहर ठाण्याचे पो.नि. वासुदेव देसले, संजिवनी कारखान्याची आपत्ती व्यवस्थापनची टीम घटनास्थळी हजर होते. ग्रामस्थांच्या मदतीने त्यांनी दोन्ही मृतांना बाहेर काढले असून शवविच्छेदन करण्यासाठी कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले आहे.
सदर चौघे जण या ठिकाणी नेमके कशासाठी गेले होते हे मात्र अजून नक्की समजू शकले नाही. याबाबत पुढील तपास पोलीस करीत आहे. सदर घटनेने तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.