श्रीगोंदा

Shrigonda News : श्रीगोंद्यात झालेल्या अपघातात दोघांचा मृत्यू

Shrigonda News : श्रीगोंदा तालुक्यात झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातांत काष्टी आणि सप्रेवाडी येथील दोन जणांचा जागीच मृत्यू झाला तर एक जण किरकोळ जखमी झाला. रविवारी (दि. २६) संध्याकाळच्या सुमारास ही अपघाताची घटना घडली.

जालिंदर जयसिंग काळे (वय ५१), रा. काष्टी, अक्षय हरिभाऊ सप्रे (वय २९), रा. सप्रेवाडी, श्रीगोंदा, अशी दोन्ही मयतांची नावे असून, रामदास कोळेकर हे किरकोळ जखमी झाले.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, तालुक्यातील काष्टी येथील जालिंदर काळे व रामदास कोळेकर हे दोघे जण कामानिमित्त न्हावरा. ता. शिरुर येथे गेले होते.

रविवारी (दि.२६) रोजी सायंकाळी सातच्या सुमारास घरी येत असताना चाकण – बीड महामार्गावर इनामगाव, ता. शिरुर येथे पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसमोर जालिंदर काळे यांच्या (एम. एच. १२ ए. इ ६४०), या दुचाकीस समोरून भरधाव आलेल्य (एम. एच. १२ एस. आर. २८७८ या दुचाकीने जोराची धडक दिली.

या भीषण धडकेत जालिंदर काळे यांचा जागीच मृत्यू झाला तर त्यांच्या सोबत असलेले रामदास कोळेकर हे किरकोळ जखमी झाले. घटनेनंतर धडक देणारा दुचाकी चालक पळून गेला.

दुसऱ्या घटनेत नगर दौंड महामार्गावर काष्टी गावच्या शिवारातील परिक्रमा कॉलेजच्या गेटसमोर कुरकुम एमआयडीसी येथे कंपनीत कामाला जाणाऱ्या अक्षय हरिभाऊ सप्रे (वय २९), रा. सप्रेवाडी, श्रीगोंदा, या तरुणाच्या (एम. एच. १६ इपी. ८९८१), या दुचाकीला समोरून भरधाव येणाऱ्या आयशर टेम्पोने जोराची धडक दिली.

या अपघातात मोटारसायकल चालक अक्षय हरिभाऊ सप्रे याचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी श्रीगोंदा आणि शिरूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस करत आहेत.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts