अहमदनगर Live24 टीम, 15 फेब्रुवारी 2022 :- राहुरी तालुक्यात पुन्हा वाळूतस्करांचा उच्छाद समोर आला आहे. नायब तहसीलदार पुनम दंडिले मुळा नदीपात्रात चोरटी वाळू वाहतूक करणार्या टेम्पोला ताब्यात घेऊन कारवाई करत असताना दोन आरोपींनी कोतवालाचे अपहरण करून वाळूचा टेम्पो पळविला.
याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी, राहुरी येथील महसूल विभागातील नायब तहसीलदार पुनम महादेव दंडिले या एका कर्मचार्याला (कोतवाल) सोबत घेऊन रात्री दहा वाजे दरम्यान राहुरी तालुक्यातील पिंपरी वळण भागात गस्त घालत होत्या.
त्यावेळी आरोपी हे मुळा नदीपात्रात टेम्पोमधून चोरटी वाळू वाहतूक करत असताना दिसले. त्यावेळी तहसीलदार दंडिले यांनी एका कर्मचार्याला टेम्पोमध्ये बसवून टेम्पो राहुरी येथील तहसील कार्यालयाच्या आवारात घेण्यास सांगितले.
मात्र, आरोपींनी टेम्पो तहसील कार्यालयाच्या आवारात न आणता टेम्पोचा वेग वाढवून टेम्पो व कर्मचार्याला घेऊन वळण पिंप्री, खेडले परमानंद सोनईच्या दिशेने वेगात घेऊन गेले.
पुढे जाऊन साक्षीदार कर्मचार्याचा मोबाईल हिसकावून घेतला. तसेच त्याला टेम्पोच्या खाली उतरून दिले आणि शिवीगाळ दमदाटी केली.
तसेच 5 लाख रुपये किमतीचा टेम्पो व 20 हजार रुपये किमतीची दोन ब्रास वाळू असा एकूण 5 लाख 20 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल घेऊन आरोपी पसार झाले.
नायब तहसीलदार दंडिले यांनी राहुरी पोलिसांत दिलेल्या फिर्यादीवरून दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.