समन्यायी पाणी वाटपाचा फटका आता नगरकरांनाही बसणार आहे. शहराच्या पाणीपुरवठ्यात २० टक्के पाणी कपात करण्याचा आदेश मुळा पाटबंधारे विभागाने दिला असून, शहराच्या पुरवठ्यात ८ हजार १२० दशलक्ष लिटरची कपात होणार आहे. त्यामुळे यंदाच्या उन्हाळ्यात नगरकरांना पाणीटंचाईचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे.
यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस पडला. त्यामुळे मुळा धरण पूर्ण क्षमतेने भरलेले नाही. परिणामी, टंचाईसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. असे असतानाच समन्यायी पाणी वाटप धोरणाची अंमलबजावणी करण्यात आली आहे.
न्यायालयाच्या आदेशाने मुळा धरणातून १.९६ टीएमसी पाणी जायकवाडी धरणात सोडण्यात आले आहे. त्यामुळे धरणातील पाणीपातळी कमी झाली असून, पाणी योजना व औद्योगिक पाणी वापरात २० टक्के कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
मुळा धरणातून अहमदनगर शहरासह २२ पाणी योजनांद्वारे पाणीपुरवठा करण्यात येतो. यामध्ये महापालिकेच्या पाणी योजनेचा समावेश आहे. शहरासाठी जुलै २०२३ ते जून २०२४ या काळात ४०.५८ दलक्ष घनमीटर इतका मंजूर कोटा आहे.
या पाणीसाठ्यातून २० टक्के कपात झाल्यास शहराला ३२.३६ दशलक्ष घनमीटर इतका पाणीपुरवठा होईल. त्यामुळे यंदा पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असे आवाहन पाटबंधारे विभागाकडून करण्यात आले आहे.
पिण्यासह औद्योगिक वापरासाठी ८० टक्केच मिळणार पाणी
समन्यायी पाणी वाटपामुळे मुळा धरणातून जायकवाडी धरणात पाणी सोडण्यात आले आहे.त्यामुळे पिण्यासाठी करण्यात येणाऱ्या पाणीपुरवठ्यात यंदा २० टक्के कपात करण्यात येणार आहे. त्यामुळे पिण्यासाठी ८० टक्के इतकेच पाणी उपलब्ध होणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
महापालिकेने गतवर्षी २७.१८ दशलक्ष घनमीटर पाण्याची मागणी मुळा पाटबंधारे विभागाकडे केलेली आहे. त्यात वाढ करून चालूवर्षी ३९.५८ दशलक्ष घनमीटरची मागणी करण्यात आली असून,
महापालिकेला ४०.५८ दशलक्ष घनमीटर इतके पाणी मंजूर आहे. शहराच्या मंजूर कोट्यातून २० टक्के कपात करण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.