सरत्या वर्षाला निरोप देताना होणारे गैरप्रकार टाळण्यासाठी पोलीस प्रशासन सज्ज झाले आहे. दारू पिऊन वाहन चालवताना आढळल्यास संबंधित वाहन चालकाला १० हजार रुपयांच्या दंड करण्यात येणार आहे. या रात्री पोलीस ठिकठिकाणी नाकाबंदी करणार आहे.
उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांनी याबाबत नियोजन केले आहे. आज ३१ डिसेंबर व नविन वर्षाच्या स्वागताच्या पार्श्वभूमीवर संगमनेर उपविभागातील संगमनेर शहर, संगमनेर तालुका, अकोले, घारगाव, आश्वी, राजूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत योग्य तो पोलीस बंदोबस्त नेमण्यात येणार आहे.
या वर्षामध्ये संगमनेर उपविभागात एकुण १३२ अपघात झालेले असून त्यात १३९ नागरीक मयत झालेले आहेत. यात बऱ्याच वाहन चालकांनी मद्यपान करुन वाहन चालविल्याचे निदर्शनास आले होते. त्यामुळे पोलीस ठिकठिकाणी नाकाबंदी करणार आहे.
सदरची नाकाबंदी ३१ डिसेंबरच्या रात्री पासून १ जानेवारीच्या पहाटे पर्यंत करण्यात येणार आहे. मद्यपान करुन वाहन चालविताना आढळल्यास वाहन चालकाविरुद्ध ड्रंक अँड ड्राईव्हच्या केसेस करण्यात येणार आहे.
यात दहा हजार रुपयांच्या दंडाची तरतूद आहे. अल्पवयीन मुले वाहन चालवितांना आढळल्यास त्यांच्या पालकावर मोटार वाहन कायदा १८० नुसार गुन्हे दाखल करण्यात येणार आहे. रस्त्यावर बेशिस्त, बेदरकारपणे वाहन चालविणे, गोंगाट करुन वाहन आढळल्यास कायदेशिर कारवाई करण्यात येणार आहे.
रात्री मुदती नंतर डिजे, वाद्य वाजवितांना मिळुन आल्यास सदरचे वाद्य, वाहन जप्त करुन गुन्हे दाखल करण्यात येणार आहे. सरत्या वर्षास निरोप देतांना व नववर्षाचे स्वागत करताना कोणत्याही प्रकारे कायद्याचे उल्लंघन होणार नाही. याची नागरिकांनी दक्षता घ्यावी, असे आवाहन उपविभागीय पोलीस अधिकारी वाघचौरे यांनी केले आहे.