आपल्या ओघवत्या, स्वतःच्या स्वतंत्र अशा वक्तृत्व शैलीत सहजसुंदर, शास्त्रशुद्ध निवेदन करत स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणारे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध सूत्रसंचालक उद्धव काळापहाड (Uddhav Kalapahad) यांना सिने अभिनेत्री माधुरी पवार (Actress Madhuri Pawar) यांच्या हस्ते अंबेश्वर उद्योग समूह अंभोरा यांच्या वतीने त्यांच्या कला क्षेत्रातील योगदानाबद्दल उत्कृष्ठ निवेदक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
आष्टी तालुक्यातील अंभोरा फाटा येथील अंबेश्वर कृषी वन च्या उदघाटन समारंभात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. उद्धव काळापहाड यांनीच या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले आणि त्यांच्या स्वरकबिरा ऑर्केस्ट्राने (Swarkabira Orchestra) उपस्थितांचे मनोरंजन केले.
उद्धव काळापहाड यांच्या आवाजातील कविता, कथा महाराष्ट्र राज्यात प्रसिद्ध झाल्या, ज्यांच्या आवाजातील कथांना कोट्यवधी व्ह्यूज सोशल मीडियावर मिळालेले आहेत. अनेक राजकीय नेत्यांच्या प्रसिद्ध पावलेल्या माहिती पटांना उद्धव यांनी आवाज दिलेला आहे.
उद्धव काळापहाड हे प्रसिद्ध निवेदक असून त्यांनी शरद पवार, देवेंद्र फडणवीस, पंकजा मुंडे, धनंजय मुंडे, अजित पवार ,आदित्य ठाकरे यांच्या सभांचे अनेकदा सूत्रसंचालन करून त्या सभा गाजवल्या आहेत.
हजारोंच्या संख्येने उपस्थित असलेल्या जनसमुयासमोर अनेक नामांकीत कार्यक्रम करून त्यांनी अतिशय कमी वयात नावलौकिक निर्माण केला. आवाजाच्या क्षेत्रात व्यावसायिक म्हणून काम करताना त्यांचा अनेक सामाजिक उपक्रमांत सहभाग असतो.
युवा उद्योजक सागर आमले, अमोल आमले यांनी पुढाकार घेऊन ग्रामीण तसेच शहरी लोकांसाठी अंबेश्वर कृषी वनाची सुरुवात केली. आमदार सुरेश धस, आमदार बाळासाहेब आजबे, तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर यावेळी उपस्थित राहिले. अंबेश्वर उद्योगसमूहाच्या वतीने या पुरस्काराची निवड जेष्ठ विधिज्ञ adv शिवाजी कराळे ,सुभाष आमले, adv सचिन चंदनशिव, प्रविण अनभुले, विकास आमले, दादा गवळी ,गोरख खाकाळ यांनी केली.
उद्धव काळापहाड सारख्या निवेदकाला मिळालेला हा पुरस्कार इतर तरुणांसाठी हा पुरस्कार प्रेरक ठरेल असं मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त करत त्यांचं अभिनंदन केलं. एम ए डीएड करून नोकरीचा मार्ग न निवडता निवेदन क्षेत्रात आपले स्वतःचे अस्तित्व निर्माण करून आपले नाव कमावल्याने त्यांच्याकडे सोशल आयडॉल म्हणून पाहिले जाते. बीड जिल्ह्यात आम्ही उद्धव यांना बोलावून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन घडेल असे कार्यक्रम घेऊ असं सागर आमले यांनी मत व्यक्त केले.