Ahmednagar News:औरंगाबादचे नामांतर आधी संभाजीनगर आणि नंतर छत्रपती संभाजीनगर करण्यात आले. अर्थात तो वादही आता कोर्टात पोहचला आहे.
तेथे नामांतराला विरोध होताच. पण जे नाव सूचविले जात होते, ते एकच होते. अहमदनगरच्या नामांतराचीही जुनीच मागणी आहे. मात्र, नवीन नाव काय असावे यावर एकमत नाही. यासाठी वेगवेगळ्या संघटनांकडून वेगवेगळी नावे पुढे करण्यात आली आहेत.
आंबिकानगर, अहिल्यानगर, आनंदनगर ही नावे पुढे करण्यात आली आहेत. असे असले तरी सामान्य नागरिकांना मात्र यात फारसा रस नसल्याचे दिसून येते.दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आंबिकानगर नाव देण्याची मागणी केली होती.
बराच काळ ते नाव चर्चेत होते. अलीकडे शिवसेनेचे आता शिंदे गटात गेलेले खासदार सदाशिव लोखंडे यांनीही आंबिकानगर नावाची मागणी केली होती. मध्येच भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी अहिल्यानगर नाव देण्याची मागणी पुढे केली.
त्यामुळे या मागणीलाही जोर आला. ते सुरू असतानाच महाराष्ट्र नव निर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष सुमित वर्मा यांनी आंबिकानगर नाव पुढे करून त्याच्याशी ठाकरे यांची आठवण जोडून मागणी केली.
मधल्या काळात हे प्रकरण थंड झालेले असताना पडळकर यांन नव्या सरकारकडे पुन्हा आपली मागणी मांडली. त्यातच औरंगाबाद आणि उस्मानाबादचे नामांतर करण्यात आले.त्यामुळे आता अहमदनरच्या नामातंराच्या मागणीने उचल खाल्ली आहे.
आता आनंदनगर हे नाव पुन्हा पुढे करण्यात आले आहे. जैन समाजाने अहमदनगरचे नाव ‘आनंदनगर’ करावे अशी मागणी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन पाठविण्यात आले आहे.
समाजाचे शिष्टमंडळ मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांची प्रत्यक्ष भेट घेवून आपली मागणी मांडणार असल्याची माहिती जितो अहमदनगरचे अध्यक्ष अमित मुथा यांनी दिली. राष्ट्रसंत आचार्य आनंदऋषीजी म.सा.यांची जन्मभूमी, तपोभूमी तसेच कर्मभूमी असल्याने त्यांचे नाव देण्याची मागणी होत आहे.