अहमदनगर बातम्या

अमित शहा म्हणाले…मी सहकार तोडायला नाही, तर जोडायला आलो आहे

अहमदनगर Live24 टीम, 18 डिसेंबर 2021 :- सहकार चळवळ मागे का पडली. याचा अभ्यास केला पाहिजे. केवळ सरकारने मदत करून चालणार नाही. सहकार चळवळ मागे का पडली, हजारो कोटींचे घोटाळे कसे झाले? आपल्यातील दोषही आपण दूर केले पाहिजेत.(Minister Amit Shah) 

ही आपली जबाबदारी आहे. सहकारासाठी काहीही मदत लागली तरी नरेंद्र मोदी सरकार 24 तास मदतीसाठी तयार आहे, असे आश्वासन केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी दिले.

प्रवरानगर इथं होत असलेल्या राज्यस्तरीय सहकार परिषदेत बोलताना भाजप नेते आणि देशाचे पहिले सहकार मंत्री अमित शहा यांनी सहकारातील भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून जोरदार हल्लाबोल केला आहे.

दरम्यान शहा यांनी पहिल्याच सहकार परिषदेत राज्यातील सहकार क्षेत्रातील नेत्यांवर नाव न घेता तुफान फटकेबाजी केली. प्रवरानगर येथे राज्यस्तरीय सहकार परिषद तथा शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.

माजी मंत्री, भाजपचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पुढाकारातून ही परिषद झाली. त्यामध्ये मंत्री शहा बोलत होते. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर, केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, डॉ. भागवत कराड,

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, राज्य सहकारी बँकेचे अध्यक्ष विद्याधर अनास्कर, साखर कारखाना संघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावर, खासदार डॉ. सुजय विखे पाटील यावेळी उपस्थित होते.

यावेळी बोलताना मंत्री शहा म्हणाले की, ‘देशाच्या वाटचालीत सहकार क्षेत्राचा मोठा वाटा असूनही स्वातंत्र्यानंतर ७५ वर्षांत याचा देशपातळीवर विचार झाला नव्हता.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही गरज ओळखून केंद्रीय सहकार मंत्रालय स्थापन केले. त्याची सूत्रे माझ्याकडे सोपवण्यात आली. मात्र, त्यावेळी महाराष्ट्रातील सहकारातील काही नेत्यांनी विविध शंका उपस्थित केल्या.

परंतु आपण सहकार तोडण्यासाठी नव्हे तर जोडण्यासाठी आलो आहोत. माझ्यावर टीका करण्यापेक्षा त्या नेत्यांनी आपण सहकारासाठी काय केले? याचे आत्मपरीक्षण करावं,’ अशा शब्दांत शहा यांनी टीकाकारांना सुनावलं आहे.

तसेच पुढे बोलताना शहा म्हणाले, देशात 31 टक्के साखरेचे उत्पादन सहकारी साखर कारखाने करतात. देशात 20 टक्के दूध सहकाराच्या माध्यमातून विकले जाते.

अनेक क्षेत्रात सहकाराच्या माध्यमातून मोठी उलाढाल होत आहे. लवकरच साखर कारखान्यांवरील संकट रिझर्व्ह बँकेच्या माध्यमातून दूर करणार आहे.

रिझर्व्ह बँकेकडून साखर कारखान्यांना लवकरच मदत करणार आहे. साखर कारखाने सुरू राहण्यासाठी सरकारचा प्रयत्न आहे. मी सहकार तोडायला नाही, तर जोडायला आलो आहे. राज्य सरकारनेही राजकारणापलीकडे जाऊन याचा विचार करायला हवा.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts