Ahmednagar News : राहुरी तालुक्यातील शिलेगाव येथील मुळा नदीपात्रातील विहिरीत हातपाय बांधलेल्या अवस्थेत सापडलेल्या तरुणाच्या खून प्रकरणातील एका आरोपीला गुरुवारी राहुरी न्यायालयात उभे केले असता सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. विजय अण्णासाहेब जाधव, वय ३०, रा. आरडगाव, बिरोबानगर असे मृताचे नाव आहे.
तालुक्यातील शिलेगाव येथील मुळा नदीपात्रातील विहिरीत विजय जाधव, वय ३० या तरुणाचा हातपाय बांधलेल्या अवस्थेतील मृतदेह तसेच लाकडी दांडा व चप्पल आढळून आला होती. या घटनेबाबत विजय जाधव याचे चुलते रमेश जाधव यांनी राहुरी पोलिसात फिर्याद दिली होती. या फिर्यादीत म्हटले,
मंगळवारी, १४ मे रोजी विजय हा काही मित्रांबरोबर शिलेगाव येथील यात्रेत गेला होता. यात्रेत मित्रांबरोबर भांडण झाल्याने काही जणांनी विजयला लाथाबुक्क्यांनी व लाकडी दांड्याने मारहाण केली होती. या घटनेतील राहुल जगधने याला विजयच्या नातेवाईकांनी पोलिसांच्या ताब्यात दिले होते.
बुधवारी, १५ मे रोजी सकाळी विजय जाधव याचा हातपाय बांधलेला मृतदेह, लाकडी दांडे व चप्पल विहिरीतील पाण्यात आढळून आले. या घटनेची खबर मिळताच पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक देवेंद्र शिंदे, सुरज गायकवाड, राहुल यादव,
प्रमोद ढाकणे, विकास साळवे, रोहित पालवे, संतोष राठोड, भाऊसाहेब शिरसाठ, गणेश लिपने आदी पोलिस पथकासह रुग्णवाहिका चालक सचिन धसाळ यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिस पथकाने स्थानिक तरुणांच्या मदतीने मृतदेह पलंगावर ठेवून विहिरीतून बाहेर काढला.
या घटनेबाबत तुकाराम आण्णासाहेब जाधव यांच्या फिर्यादीवरून आरोपी दिगंबर म्हसे, राहुल जगधने व बापू तागड, रा. शिलेगाव, ता. राहुरी यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपी दिगंबर म्हसे व बापू तागड हे दोघेजण पसार झाले असून पोलिस पथके त्यांचा शोध घेत आहेत.
दरम्यान, सरकारी वकील रवींद्र गागरे यांनी न्यायालयात आरोपीला सात दिवसांची कोठडी मागीतली. या घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक शिंदे करीत आहेत.