अहमदनगर बातम्या

राज्यात अनागोंदी वाढली ; सरकारने तातडीने पायउतार व्हावे किंवा केंद्राने राष्ट्रपती राजवट लागू करावी..!

Ahmednagar News : राज्यात कायदा सुव्यवस्था ढासळली असून अनागोंदी वाढली आहे. महिला व बालिका असुरक्षित असल्याने या सरकारने तातडीने सत्तेवरून पायउतार व्हावे किंवा केंद्र सरकारने राष्ट्रपती राजवट लागू करावी, अशी मागणी काँग्रेस पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी केली आहे.

बदलापूर घटनेच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी काळ्या फिती, काळे झेंडे तसेच तोंडाला काळा मास्क लावून बदलापूर घटनेचा संगमनेर बसस्थानकासमोर निषेध नोंदवला.

यावेळी आमदार थोरात बोलत होते ते म्हणाले की, बदलापूरची झालेली घटना ही अत्यंत लांचनास्पद आहे. या घटनेतील गुन्हेगाराची पार्श्वभूमी ही वाईट होती.

संस्थाचालकांनी हे प्रकरण दाबून टाकण्याचा प्रयत्न केला. त्याला पोलिसांची साथ मिळाली. लाडकी बहीण योजना सर्वत्र सुरू आहे. मंत्रिमंडळ बहिणीकडून राख्या बांधून फोटोसेशन करत आहे. मात्र दुसरीकडे या बहिणीचे रक्षण करण्यास सरकार अपयशी ठरले आहे.

मागील आठ दिवसांमध्ये महिलांवरील अत्याचाराच्या खूप घटना घडल्या आहेत. प्रशासनाचा धाक राहिला नाही. मंत्रालयात सर्व फक्त टक्केवारीत गुंतले आहेत. गुन्हेगारांवर धाक राहिला नाही.

संस्थाचालक ४८ तास हे प्रकरण दाबण्याच्या मनस्थितीत होते. या प्रकरणात पोलिस विनाकारण कोणाला मदत करतील, असे समजण्याचे कारण नाही. मात्र सरकारकडूनच निर्देश असावेत. संस्थाचालकांना व आरोपीला मदत करण्याचे असे या घटनेवरून दिसून येत आहे.

पालक ज्या वेळेला पोलिस स्टेशनला जातात, त्यांना १२ तास बसून ठेवले ते, हे अत्यंत वाईट असल्याची टीका आ. थोरात यांनी केली. तसेच महाराष्ट्रात सध्या काय चाललंय हेच समजत नाही. गेल्या अडीच वर्षांपासून प्रशासनावर कोणतेही नियंत्रण नाही. आम्ही बंद पुकारला होता. त्यात राजकीय हेतू नव्हता, असेही ते शेवटी म्हणाले .

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts