अहमदनगर : अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या राज्यव्यापी संपात केलेल्या मागण्याची तातडीने सोडवणूक करावी व अंगणवाडी कर्मचाऱ्यांना सेवेतून कमी करण्याबाबत काढलेल्या बेकायदेशीर नोटीसा रद्द करण्याच्या मागणीसाठी अहमदनगर जिल्हा अंगणवाडी सेविका मदतनीस कर्मचारी संघटनेच्या वतीने जिल्हा परिषदेवर धरणे धरुन शिट्टी वाजवा आंदोलन करण्यात आले.
महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्या वतीने अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी 4 डिसेंबर पासून संप सुरु आहे. 15 डिसेंबर रोजी नागपूर हिवाळी अधिवेशनावर कर्मचाऱ्यांनी प्रचंड मोर्चा काढूनही शासनाने सदर संपासंदर्भात कुठलाही सकारात्मक तोडगा काढला नाही. शासनाशी वारंवार चर्चा सुरू असून, अद्याप मार्ग निघालेला नाही.
या पार्श्वभूमीवर ३ व ४ जानेवारी रोजी आझाद मैदानात मुंबई येथे अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे आंदोलन झाले. सदर मोर्चानंतर मुख्यमंत्री व महिला बालकल्याण विभागाच्या सचिव यांच्यासह कृती समितीच्या शिष्टमंडळाची बैठक होऊन सकारात्मक चर्चा झाली. मात्र शासनाने याबाबत कुठलेही लेखी पत्र अथवा प्रस्ताव न दिल्याने संप सुरू असल्याचे संघटनेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.
प्रशासनाने १२ एप्रिल २००७ च्या शासन निर्णयाचा आधार घेत संपावर गेलेल्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांना सेवेतून कमी करण्याच्या नोटिसा दिलेल्या आहेत. जिल्ह्यात काही कर्मचाऱ्यांना सेवेतून कमी करण्याचे कार्यवाही सुरू आहे.
शासनाला बेमुदत संपाची नोटीस देऊन सर्व अंगणवाडी कर्मचारी संपावर गेल्या आहेत. शासनाने त्यांच्या प्रश्नावर तोडगा काढण्याऐवजी त्यांना वेठबिगारी सारखी वागणूक देत असल्याचे निवेदनात म्हंटले आहे. निवेदन उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनोज ससे यांना देण्यात आले.