Ahmednagar Politics : लोक सभेच्या निवडणुकीत अनेकांच्या नाराजीचा विखेंना मोठा फटका बसला आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीनंतर विखेंनी ताकही फुंकून पित असल्याचे बोलले जात आहे.
मात्र आता नुकत्याच राहाता येथे पंचायत समितीचे उद्घाटन समारंभावरून देखील सत्ताधारी भाजप व शिवसेना यांच्यात मानापमान नाट्य रंगले आहे. त्यामुळे येणाऱ्या विधानसभेला ही नाराजी ओढवणार असल्याचे दिसून येत आहे.
राहाता येथे पंचायत समितीचे उद्घाटन पंकजा मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत विखेंनी आयोजित केलेला कार्यक्रम मोठ्या थाटात संपन्न झाला असताना मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला विखेंनी साधे निमंत्रण दिले नसल्याने शिवसैनिकांत प्रचंड नाराजी पसरली आहे.
त्यामुळे या कार्यक्रमात डावलले गेल्याने शिवसेना पदाधिकारी नाराज झाले आहेत. त्यामुळे येणाऱ्या निवडणुक काळात विखेंना शिंदेगटाकडून फटका बसण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
सध्या महायुतीचे सरकार असुन महायुतीत एकजूट आहे. असे वारंवार भासविले जात असले तरी राहात्यात पंचायत समितीचे पार पडलेल्या कार्यक्रम हा भाजपचाच असल्याचे मंत्री राधाकृष्ण विखे यांनी दाखवून दिले आहे.
महायुती एक असल्याच्या केवळ वल्गना असल्याचेही या निमित्ताने उघड झाले आहे. उपमुख्यमंत्री पवार यांच्या राष्ट्रवादीत असलेले आणि कोल्हे परिवाराला शह देण्यासाठी जवळ केलेले आ. आशुतोष काळे यांना मात्र आवर्जून निमंत्रण देण्यात आले होते.
मात्र शिवसेनेला विखेंनी साधे निमंत्रण दिले नसल्याने राहाता तालुक्यातील शिंदे गटाच्या शिवसेना पदाधिकाऱ्यांनी याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. जिल्हाप्रमुख कमलाकर कोते व तालुका प्रमुख सागर बोठे यांनी याकडे मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधण्यात येणार असल्याचे सांगितले. शिवसेना पदाधिकाऱ्यांना का डावलले जाते!, हे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी जाहीर करावे.
आमच्या पक्षाच्या जिल्हाप्रमुखांना डावलून हा कार्यक्रम होत असल्याने आम्ही सर्वांनी कार्यक्रमावर बहिष्कार टाकला, अशी प्रतिक्रिया कोते व बोठे यांनी दिली आहे. त्यामुळे आगामी काळात विखे यांना सर्वाना सोबत घेउन काम करावे लागणार आहे.