अहमदनगर बातम्या

अण्णा हजारे म्हणतात ‘तुमच्या राज्यात मला जगायची इच्छा नाही, असं मी सरकारला कळवलं होतं…

अहमदनगर Live24 टीम,  13 फेब्रुवारी 2022 :- किराणा दुकानांतून वाईन विक्रीला परवानगी देण्याच्या निर्णयाविरोधात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी आता थेट बेमुदत उपोषण करण्याचा इशारा दिला आहे.

हजारे यांनी यासंबंधीचे पत्र सरकारला ३ फेब्रुवारीलाच पाठवलं आहे सरकारच्या या निर्णयाविरोधात समाजसेवक अण्णा हजारे यांनी उद्या १४ फेब्रुवारीपासून प्राणांतिक उपोषण करण्याचा इशारा दिला होता. दरम्यान, या संदर्भात लवकरच ग्रामसभा घेऊन निर्णय घेणार असल्याचं त्यांनी सांगितलं.

राळेगण सिद्धीमध्ये माध्यमांशी संवाद साधताना दारूच्या दुकानात वाइन मिळते, मग सुपरमार्केटमध्ये परवानगी देण्याचं कारण काय, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

मार्केटमध्ये आधीच इतक्या प्रमाणात दारुची दुकानं आहेत, त्यात तुम्ही आणखी वाढवत आहात, तुम्हाला सर्वच लोकांना व्यसनाधीन बनवायचं आहे का?, असा प्रश्न अण्णा हजारेंनी राज्य सरकारला विचारला आहे.

लोकं व्यसनाधीन झाले की राज्य सरकारला जे साधायचं असेल ते साधता येईल, म्हणून हा निर्णय घेतल्याची टीका त्यांनी केली. तसेच बालकं जर दारूच्या आणि वाइनच्या अधीन गेलीत तर आपल्या देशाचं काय होईल,

अशी चिंता त्यांनी व्यक्त केली. परमिट रूम असताना सुपरमार्केटमध्ये वाईन विक्रीचा घाट का असा प्रश्न सरकारला अण्णा हजारेंनी केलाय. अण्णांनी वयाचा विचार करून उपोषणाचा निर्णय घ्यावा अशी राळेगणसिद्धी ग्रामसभेची मागणी होती.

ती मागणी मान्य करत अण्णांनी उपोषणाला न बसण्याचा निर्णय घेतलाय. अण्णा हजारे यांनी म्हटलं, तुम्ही वाईन का आणता… आणि अशा प्रकारे खुल्या बाजारात तुम्ही विक्री करायला ठेवताय.

म्हणून मला तुमच्या राज्यात जगायचं नाहीये. हा प्रश्न राळेगणचा नाहिये तर राज्याचा आहे. अरे वाईन की काय आपली संस्कृती आहे का? आयुष्य बरबाद करायला निघालेत. म्हणून जगायची इच्छा होत नाही.

झाले 84 वर्षे खूप झाले. अशा प्रकारचा निर्णय सरकार घेत आहे. काल राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या सचिव आल्या होत्या भेटायला.

मी त्यांना सांगितलं, तुम्हाला हा निर्णय घ्यायचाच होता तुम्हाला तर तुम्ही आधी जनतेचं मत विचारात घ्यायला हवं होतं. त्यांनी सांगितलं, तुमच्या मताप्रमाणे आम्ही वाईन विक्रीचा जो काही निर्णय जनतेला विचारल्याशिवाय घेणार नाही.

मी त्यांना सांगितलं, मंत्रिमंडळाने घेतलेला निर्णय जनतेसमोर ठेवा आणि जनतेने जर परवानगी दिली तर तुम्ही विचार करा, नाहीतर नाही. रद्द करा. लोकशाहीत जनता प्रमुख आहे.

दरम्यान अण्णा हजारेंचं वय पाहता राळेगणसिद्धीच्या ग्रामस्थांनी त्यांना उपोषण न करण्याचा सल्ला दिला आहे. त्याचाच भाग म्हणून आज अण्णा हजारे यांनी राळेगणसिद्धीमध्ये घेतलेल्या ग्रामसभेत सर्वांनी हात वर करुन अण्णा हजारेंना उपोषण न करण्याची विनंती केली.

त्यानंतर अण्णा हजारे यांनी उपोषण न करण्याचा निर्णय घेतला. सरकारने ९० दिवसांत या निर्णयावर जनतेचे मत जाणून घ्यावे आणि त्यानंतर अंतिम निर्णय घ्यावा, असा ठराव ग्रामसभेत झाला.

अण्णा हजारे यांना सभेत उपोषण न करण्याबाबत विनंती करण्यात आली. त्यानुसार हजारे यांनी उद्यापासून होणारे उपोषण स्थगित केलं आहे. या वयात अण्णांनी आता उपोषण करू नये, असं भावनिक आवाहन अरुण भालेकर यांनी केलं.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts