अहमदनगर Live24 टीम, 08 जानेवारी 2022 :- राहुरी: तालुक्यातील ताहाराबाद येथील कारभारी कोंडाजी औटी यांनी आपल्या जनावारांच्या गोठ्यात शिरलेल्या बिबट्याला तेथेच कोंडून ठेवला. आणि तात्काळ वन विभागाशी संपर्क साधल्यामुळे नुकसानही टळले आणि बिबट्याही पकडला गेला.
यामध्ये औटी यांनी धाडस आणि तत्परता दाखविली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, औटी यांच्या गोठ्यात 2 गायी आणि कोंबड्यांचा खुराडा होता.
बिबट्या जेंव्हा गोठयात शिरला व त्याने गोठ्यात असलेल्या गायीवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला, पण गायीने त्याला प्रतिकार केल्याने बिबट्या घाबरून गेला.
नंतर तो गोठ्यातच असलेल्या कोंबड्याच्या खुराड्यात शिरला, खुराड्यात बिबट्या शिरताच कोंबड्या घाबरून बाहेर पडल्या. गायीला घाबरलेल्या बिबट्याने कोंबड्यावर सुद्धा हल्ला केला नाही.
ही गोष्ट औटी यांच्या लक्षात येताच त्यांनी तत्काळ गोठ्याचा दरवाजा बंद करून घेतला. औटी यांनी धाडस करून त्याला गोठ्यातच कोंडले. गोठ्याचा दरवाजा त्यांनी बंद केल्याने बिबट्याला पिंजऱ्यात पकडण्यासाठीची मोहीम यशस्वी झाली आणि पहाटे दोनच्या सुमारास बिबट्या पिंजऱ्यात जेरबंद झाला.
याबद्दल औटी यांनी वनविभागाला माहिती दिली असता राहुरीचे वनपरीक्षेत्र अधिकारी गायकवाड ताफ्यासह घटनास्थळी पोहोचले. पुढे त्यांनी तात्काळ पिंजरा लावला, त्यांना पहाटे दोन वाजता बिबट्या जेरबंद करण्यात यश आले.
यावेळी सर्पमित्र कृष्ण पोपळघट, चांगदेव किंकर, मुनीर देशमुख, गुलाब शेख, किरण उदावंत, नारायण झावरे, सुखदेव औटी, बाळासाहेब औटी यांनी यासाठी सहकार्य केले.
जेरबंद करण्यात आलेली बिबट्याची मादी सहा ते सात वर्षांची असून तिला माणिकडोह येथील बिबट्या निवारा केंद्रात शुक्रवारी नेण्यात आले आहे.