अहमदनगर Live24 टीम, 29 डिसेंबर 2020 :-सुमारे दीड-दीड कोटीच्या दोन संशयास्पद नोंदी करून कोटीचा अपहार केल्याबद्दल येथील नगर अर्बन मल्टीस्टेट-शेड्युल्ड बँकेचे माजी अध्यक्ष व माजी खासदार,दिलीप गांधींविरुद्ध कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
दरम्यान गांधींच्या समर्थनार्थ शेवगाव तालुक्यातील काही सदस्य धावून आले आहे. नगर अर्बन बँकेचे तपासी अधिकारी दीपक चंगेडिया यांनी विरोधी मंडळातील सभासदांशी संगनमत करून व तपास न करताच जाणीवपूर्वक अपहाराचा खोटा गुन्हा दाखल करण्यास भाग पाडणारा अहवाल तयार केला आहे.
त्यामुळे चंगेडिया यांची नार्को टेस्ट करण्यात यावी’, अशी मागणी शेवगाव येथील माजी खा. दिलीप गांधी समर्थक सभासदांनी केली आहे. शेवगावच्या नगराध्यक्ष राणी मोहिते, राष्ट्रवादी काँग्रेसचे मन्सूरभाई फारोकी, शिवसेना तालुका प्रमुख अविनाश मगरे, काँग्रेसचे डॉ. अमोल फडके, मनसेचे गणेश रांधवणे, नगरसेवक कमलेश गांधी, अशोक आहुजा यांसह अनेकांनी पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांना ई-मेलद्वारे निवेदन पाठवले आहे. निवेदनात म्हटले आहे,
की नगर अर्बन मल्टिस्टेट बँकेला 110 वर्षांची परंपरा आहे. माजी खासदार दिलीप गांधी यांच्या नेतृत्वाखाली बँकेची प्रगती झाल्याचे ठेवी व बँकेचा वाढता विस्तार पाहता लक्षात येते. विरोधी मंडळातील काही सभासद गांधी यांचा राजकीय पराभव करू शकत नसल्याने त्यांनी बँकेच्या हितास बाधा आणणारी कृत्ये वेळोवेळी केली.
याचाच एक भाग म्हणून गांधी व संचालक मंडळावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गांधी तसेच नगर अर्बन बँकेच्या संचालक मंडळावर राजकीय आकसापोटी दाखल केलेला गुन्हा रद्द करण्याची मागणीही या निवेदनात केली आहे