अहमदनगर Live24 टीम, 25 मार्च 2022 :-दोन दिवसांच्या ढगाळ हवामानानंतर शुक्रवारी पुन्हा सूर्य तळपू लागला आहे. अहमदनगरमध्ये कमाल तापमान ४१.४ अंश सेल्सिअस नोंदले गेले. किमान तापमानही २१ अंशावर पोहोचले असल्याने रात्रीही प्रचंड उकाडा सहन करावा लागत आहे.
भारतीय हवामान विभागाकडे झालेल्या नोंदीनुसार किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत पाच अंशाने वाढ झाली आहे. ही वाढ अशीच कायम राहणार असून मार्चअखेरीच किमान तापमान ४२ अंश सेल्सिअसच्या पुढे जाणार असल्याचा अंदाजही वर्तविण्यात आला आहे.
उद्यापर्यंत आकाश अंशत: ढगाळ राहील. त्यानंतर आकाश नीरभ्र राहण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. तापमानात वाढ झाल्याने त्याचा आरोग्यावर परिणाम होऊन उष्णतेचे विकार बळविण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घेण्याची गरज आहे.