सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वाढती विद्यार्थी संख्या व वाढती महाविद्यालयीन संख्या यांचा विचार करून आता नगर येथे उपकेंद्राचे भूमिपूजन 6 सप्टेंबर 2022 रोजी सकाळी 10 वाजता उच्च शिक्षण मंत्री नामदार चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते तसेच महसूल मंत्री माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते होत असल्याची माहिती पत्रकार परिषदेत आज सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आधीसभा सदस्य डॉ. राजेंद्र विखे पाटील यांनी दिली.
यावेळी पुढे बोलताना डॉ विखे पाटील यांनी सांगितले विद्यापीठाच्या अधिसभेत सिनेट सदस्य म्हणून काम करताना आम्ही सातत्याने पूर्ण क्षमतेने विद्यापीठाचे उपकेंद्र चालू झाले पाहिजे अशी मागणी गेली वीस वर्षे करीत होतो पण दहा वर्षांपूर्वी बांबूर्डी घुमट येथे जागा मिळण्यात आम्ही यशस्वी झालो,
मात्र तरी निधी अभावी हे केंद्र उभे राहत नव्हते, मात्र आता नामदार राधाकृष्ण विखे पाटील व नामदार चंद्रकांत दादा पाटील यां दोघांच्या प्रयत्नातून उपकेंद्र साकारत आहोत. ह्या उपकेंद्राच्या माध्यमातून हजारो विद्यार्थी, शिक्षण संस्थाचालक यांना प्रशासकीय मदत होणार आहे. ह्या कार्यक्रमाला आपण मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन डॉ राजेंद्र विखे पाटील यांनी यावेळी बोलताना केले.
उपकेंद्र व्हावे यासाठी अहमदनगर जिल्ह्यातील अनेक आजी माजी अधिसभा सदस्य, विद्यापीठाचे विद्यार्थी, संस्थाचालक गेली वीस वर्षे प्रयत्न करत होते. आता या प्रयत्नाला यश आले आहे, पुढील काळात या उपकेंद्राच्या माध्यमातून अनेक नवीन व्यवसायिक कोर्स सुरू होतील. हे उपकेंद्र अहमदनगर जिल्ह्याच्या प्रगतीसाठी मैलाचा दगड ठरेल असा विश्वासही डॉ विखे पाटील यांनी यावेळी बोलतांना व्यक्त केला.