Ahmednagar News : राहुरी तालुक्यातील ब्राम्हणी परिसरातील घेरुमाळ वस्ती भागात बिबट्याची दहशत आजही कायम आहे. रात्री भररस्त्यात बिबट्या बराच वेळ ठाण मांडून होता.
सोमवारी रात्री गावातून वस्तीकडे जाणाऱ्या तरुणांना रस्त्याच्याकडेला कपाशी शेतात एक नव्हे तर तीन बिबटे दिसले. हे बिबटे बराच वेळ एकाच ठिकाणी तळ ठोकून होते. दिड दोन तासाने गावातून एकाच दुचाकीवर घराकडे जणाऱ्या दोन तरुणांना रस्त्यावर बिबटे दिसले.
ते तरुण दुचाकी घेवून पुन्हा ब्राम्हणी सोनई रस्त्याकडे आले. वस्तीवर मित्राला फोन करून चारचाकी मालवाहतूक गाडी बोलवली. त्यात दुचाकी टाकून पुन्हा घाबरत घरापर्यंत प्रवास केला. त्या दरम्यान त्याच ठिकाणी रस्त्याच्या कडेला पुन्हा बिबट्या दिसला.
त्याच वस्तीवरील अनेक जण सोमवारी पहाटे पंढरपूरला एक दिवशीय दर्शन यात्रेसाठी गेले होते. रात्री त्यांना येण्यासाठी दीड दोन वाजले. त्या सर्वांना घेण्यासाठी कुटुंबातील वस्तीवरील अतिरिक्त गाड्या व माणसे आली होती.
पुन्हा तीन वाजता त्याच परिसरात झेडपी शाळेलगत कपाशीचे शेत चारण्यासाठी मुक्कामी असलेल्या मेंढपाळाच्या वाड्यागावर बिबट्याने हल्ला चढविला; मात्र मेंढरांच्या बाजूला बांधलेल्या गायीने हंबरडा फोडल्याने झोपलेले मेंढपाळ जागे झाले.
पुन्हा परिसरातील रहिवासी शेतकरी जागे झाले. सकाळपर्यंत जागून आपल्या लहान मोठ्या जनावरांचे राखण केलं. अनेक दिवसापासून या परिसरात बिबट्याची दहशत कायम आहे.
वस्तीवरील जिल्हा परिषद शाळेतील व गावात आदर्श विद्यालयात शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये मोठे घबराटीचे वातावरण पसरल आहे. वस्ती परिसरात तात्काळ पिंजरा बसवावा, अशी मागणी ब्राम्हणी ग्रामपंचायतकडून वन विभागाला पत्राद्वारे करण्यात आली आहे.