Milk Price : शेतकऱ्यांच्या समस्या त्यांची पाठ सोडण्याचे नाव घेत नाहीत. पावसाच्या लहरीपणामुळे शेतीत काही पिकेना. त्यामुळे काहींनी जोडधंदा म्हणून दुधाचा व्यवसाय सुरु केला. परंतु दुधाचे भाव प्रचंड घसरले आहेत. तुलनेने खुराकाचे भाव गगनाला भिडले आहेत.
त्यामुळे शेतकऱ्यांना दूध विकून फायदा तर होईनात उलट त्यांचा खर्च धरून ते मायनस मध्ये जाऊ लागले आहेत. त्यामुळे शेतकरी संतप्त आहेत. त्यांच्या या संतप्त भावना अखेरीस उद्रेक झाल्या. नगर तालुक्यातील निमगाव वाघा येथील
शेतकऱ्यांनी रस्त्यावर दूध ओतून देत सरकारचा निषेध केला. रविवारी (दि.२६) शेतकऱ्यांनी रस्त्यावर दूध ओतून दूध दर कपातीच्या निर्णयाचा जाहीर निषेध केला आहे.
* तब्बल दहा रुपयांची घट
दूध दरामध्ये तब्बल १० रुपयांची घट झाली आहे. म्हशीच्या दुधाचा दर ५६ रुपयांवरून ४६ रुपये तर गाईच्या दुधाचा भाव ३८ वरून २८ रुपये झाला आहे. सध्या दुष्काळ असल्याने दुधाचे उत्पादन घटले असल्याने मागणी पुरवठ्याचे गणित पाहता दूध दर वाढायला पाहिजे होते.
परंतु चित्र याउलट रंगवले जात आहे. त्यामुळे शेतकरी संतप्त होत आंदोलन करू लागले आहेत. अन्नदात्याला आता उपाशी राहून आंदोलन करण्याची वेळ आली आहे. दुधाची नासाडी केल्यानंतरच सरकारला जाग येणार का? असा संतप्त सवाल शेतकरी करत आहेत.
* खुराकाच्या दरात ३० टक्के झाली आहे वाढ
सध्या चाऱ्यासह खुराकाचे, सरकी पेंड, वालिस आदींचे दरही मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. कांडी पेंड १ हजार ४०० वरून १ हजार ७०० रुपये, सरकी पेंड २ हजार रुपयांवरून २ हजार ६५० रुपये प्रमाणे खुराकाच्या दरात ३० टक्के वाढ झाली आहे.
* दुग्ध विकास मंत्र्यांच्या आदेशाचे काय झाले
दुधाच्या चढ-उतारामुळे निर्माण होणारी अस्थिरता संपविण्यासाठी दुग्धविकास विभागाने दुधाचे खरेदी दर निश्चित करण्यासाठी समिती नेमली होती. खासगी आणि सहकारी दूध संघांचे दूध कंपन्यांचे प्रतिनिधी तसेच सरकारी अधिकारी यांचा समावेश असलेल्या समितीने दर तीन महिन्यांनी दूध खरेदी दर ठरवावेत.
दूध संघांनी आणि कंपन्यांनी त्यानुसार दर द्यावेत, असे शासनाने जाहीर केले होते. याच दरम्यान पशुसंवर्धन तथा दुग्ध विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी ३५ रुपये दुधाला दर यावा असे सांगितले होते. परंतु आता त्यांच्या या आदेशाचे काय झाले? की त्यांच्याच विभागाने त्यांचाच आदेश धाब्यावर बसवला? अशी चर्चा नागरिक करत आहेत.