अहमदनगर व पुण्याला जोडण्याचे काम करणाऱ्या भीमा नदीवरील पुलाचे महाकाय खांब कोसळल्याची दुर्घटना घडली आहे. भीमा नदीवर हा नव्याने पूल तयार होत असून दौंड-गार गावादरम्यान या पुलाचे खांब कोसळले आहेत.
धरणातून आलेल्या पाण्याच्या लोंढ्याने हे खांब कोसळले असून आता निकृष्ट दर्जाचे काम असल्याने पुलाचे खांब कोसळल्याचा आरोप सध्या होत आहे. या घटनेत कोणतीही जिवीतहानी झाली नसल्याची माहिती समजली आहे.
जीवितहानी झाली नसली तरी पुलाच्या कामावर प्रश्नचिन्ह निर्माण केले जात असून दौंड आणि नगर जिल्ह्याला जोडणाऱ्या दौंड गार गावादरम्यान 20 कोटी रुपये खर्चून हे काम करण्यात येत होते. हे काम निकृष्ट असून याबाबत अनेकदा दौंड बांधकाम विभागाकडे तक्रारी केल्या आहेत असा आरोपही ग्रामस्थ करत आहेत.
ग्रामस्थांच्या मागणीकडे अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष करून हे काम असेच सुरू ठेवले. आज भीमा नदीला पाणी आले व हे खांब कोसळले आहेत. दरम्यान या बाबत एक व्हिडीओ देखील व्हायरल झाला असून गर्डर कोसळतानाचे भयानक दृश्ये यात दिसून येत आहेत. नगर व पुण्यात पहिल्या पावसाने हजेरी लावताच पहिल्याच पाण्यात लगेच पूलाचे खांब कोसळले असल्याने चिंता व्यक्त होत आहे.
पुलासाठी तब्बल 20 कोटी रूपये..
या पुलाचे भूमीपूजन 2021 साली करण्यात आले होते. या पुलासाठी 20 कोटी रूपये खर्च केला गेलाय. आता इतका पैसा खर्च करूनही या पुलाचे काम निकृष्ठ दर्जाचे होत असल्याचे आता समोर आलेय. पुलाचे काम सुरु केल्यापासून सातत्याने अडचणी समोर येत असल्याचेही संमोर आले आहे. निकृष्ट कामामुळेच हा पूल कोसळला असा आरोप स्थानिक करत आहेत.
चौकशीची मागणी
भीमा नदीवरील पुलाचे खांब कोसळल्याने आता या कामाची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी होत आहे. यामध्ये जे दोषी आढळले आहेत त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी होत आहे. सध्या या निकृष्ठ कामावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.