अहमदनगर बातम्या

मोठी बातमी! ! चालू आवर्तनातून पाणीपुरवठ्याच्या तलावांना पाणी सोडा…

Ahmednagar News : भंडारदरा व गोदावरी धरणातून सध्या सुरू असलेल्या आवर्तनातून पाणीपुरवठा योजनेच्या साठवण तलावात पाणी सोडण्यात यावे. तसेच भंडारदरा व निळवंडे धरणातील पाण्याचे जून अखेर शेती व पिण्याच्या पाण्याचे योग्य नियोजन करून शिल्लक राहिलेले पाणी प्रवरा नदी पात्रात सोडावे, अशी मागणी आमदार लहू कानडे यांनी केली.

जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील व जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत कालवा सल्लागार समितीची ऑनलाईन बैठक नुकतीच झाली. या बैठकीत आ. कानडे यांनी वरील मागणी केली.

याप्रसंगी आ. कानडे म्हणाले, सध्या गोदावरी व भंडारदरा धरणातून शेतीसाठी व पिण्यासाठी आवर्तन सोडण्यात आले आहे. या आवर्तनातून शेतकऱ्यांच्या मागणीनुसार त्यांना पाणी मिळाले पाहिजे.

शेतीचे आवर्तन पूर्ण झाल्यानंतर श्रीरामपूर- राहुरी विधानसभा मतदारसंघातील पाणी योजनासाठी असलेले तलाव भरून द्यावेत, त्यामुळे पुढील काळात पाणीटंचाई भासणार नाही.

तसेच भंडारदरा निळवंडे धरणात उपलब्ध असलेल्या पाणीसाठ्याचे शेती व पिण्याच्या पाण्याचे जून अखेर नियोजन करून शिल्लक राहणारे पाणी प्रवरा नदीपात्रात सोडण्यात यावे, अशी मागणी त्यांनी यावेळी केली.

राहुरी तालुक्यातील टाकळीमिया येथील पाणी योजनेच्या विहिरीवरील आकारण्यात आलेली पाझरपट्टी रद्द करावी. पाणीपुरवठा योजनेचे वीज कनेक्शन कट न करण्याचे आदेश देण्यात आले असून त्याची अंमलबजावणी करावी,

विधानसभा मतदार संघातील कुठल्याही ग्रामपंचायतीच्या पाणी योजनेचे वीज कनेक्शन कट करण्यात येऊ नये, तसेच तलाव भरून देण्यासाठी पाणीपट्टी मागणीची सक्ती करू नये, अशी मागणीही आ. कानडे यांनी बैठकीत केली.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts