अहमदनगर बातम्या

भाजपने डॉ. सुजय विखे पाटील यांना नगर शहर विधानसभेची उमेदवारी द्यावी…!

Ahmednagar News : सध्या लोकसभेत पराभूत झालेल्या व्यक्तींना विधानसभेवर संधी दिली जाते, तशी संधी नगर लोकसभा उमेदवारास डॉ. सुजय विखे पाटील दिली पाहिजे. शहरातून त्यांना मोठा लीड मिळालेला आहे. नगर विकासासाठी हा प्रयोग युतीची सर्व बंधने तोडून करुन पाहण्यास काही हरकत नाही. शेवटी युती महत्त्वाची नसते, संख्याबळ महत्त्वाचे असते. मुख्यमंत्रीपद महत्त्वाचे असते. काही हटवादी युती समर्थकांच्या नादी लागल्यास हाती धुपाटणे येण्याची शक्यता आहे, असे भाकित भाजपचे शहर जिल्हा उपाध्यक्ष अनिल गट्टाणी यांनी केले आहे.

विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले. ‘ये रे माझ्या मागल्या’ प्रमाणे संभ्रम सुरु झाले. अनुभवाने शहाणपण येते असे म्हणतात. पण अनुभवातून धडा शिकले तरच ! स्वबळाचा नारा देणारे निष्ठावंत थकले. आपल्या मतदार संघात आपला उमेदवार मिळेल याकडे डोळे लावून बसले. परंतु निष्ठावंतांच्या मागणीला पक्षातूनच बळ मिळेनासे झाले.

आता शिरस्थ नेतृत्वाने सखोल अभ्यास करण्याची गरज आहे. युतीच्या भानगडीने संख्या बळाचा आकडा २३ वरुन ९ आला याचाच अर्थ निवडून आलेल्या उमेदवारापेक्षा पराभूत दुप्पट झाले हेच युतीचं फलित ! मागील विधानसभेत १२३ वरुन १०५ वर संख्या आली, ही घसरण कशामुळे झाली? घडामोडी, पाडापाडी, तडजोडी हा युतीचा मुलभूत पाया आहे. त्यात आपण अडकलो तर नाहीना याचा विचार झाला पाहिजे.

या घडामोडीत आपण एक नंबरचा पक्ष आहे, हे लक्षात ठेवले पाहिजे. इतरांनी दिलेला अति आत्मविश्वासाचा इशारा लक्षात घेणे आवश्यक आहे. म्हणूनच निष्ठावंतांनी एकजूट करुन एकीचे बळ दाखविले पाहिजे. वस्तुतः घटक पक्षाशी अनावश्यक तडजोडी करण्याची गरज नव्हती.
त्या तडजोडीतून पडझडच जास्त झाली. अनावश्यक व धोकादायक घटकपक्ष दूर केले पाहिजेत. निवडणूक निकालानंतर त्यावर चर्वितचर्वण करणे योग्य नाही. ‘गतस्य शोचनम् नास्ति।’ झालेल्या गोष्टीचा शोक करणे व्यर्थ आहे.

तेव्हा घटक पक्षातून सावध होऊन आपला स्वबळाचा संसार थाटणे अधिक शहाणपणाचे ठरेल. पक्षश्रेष्ठींनी सामान्य कार्यकर्त्याचा आवाज दाबणे योग्य नाही. अन्यथा विधानसभेला इतिहासाची पुनरावृत्ती होईल, असा इशारा भाजपचे शहर जिल्हा उपाध्यक्ष अनिल गट्टाणी यांनी दिला आहे.

अहमदनगर शहराचा विचार केला असता विधानसभेसाठी अत्यंत दयनीय परिस्थिती आहे. स्वातंत्र्योत्तर कालापासून आजपर्यंत शहराला भाजपचा आमदार मिळाला नाही, हे दुर्दैव आहे. भयमुक्त नगर या गोंडस घोषणेखाली गेली २५-३० वर्षे दुसऱ्याचीच पालखी उचलली, त्यामुळे शहर उमेदवारीसाठी पक्षातीलच पदाधिकारी बाहेरचा उमेदवार सुचवू लागले. स्वपक्षात सक्षम उमेदवार तयार करण्यास पक्षाला सपशेल अपयश आले.

याचे मुख्य कारण ‘टिफिन पार्टी’ सारखे प्रयोग होय. बूथ कार्यकर्त्यांशी पार्टी ऐवजी प्रत्यक्ष संवाद साधणे वरुन निर्णय न लादता कार्यकर्त्याचे प्रत्यक्ष भेटून मत जाणून घेणे महत्त्वाचे असते. सुरुवातीला पहिले सरकार कोसळल्यानंतर मुख्यमंत्री भाजपचाच व्हायला पाहिजे होता. निवडणुकीच्या काळात मुख्यमंत्रीपद असलेल्या पक्षाला जनता झुकते माप देते, ते सिध्द झालेले आहे. स्वतःला रणनीतीकार समजणाऱ्या लोकांनी आखलेली रणनिती अखेर भ्रणनिती ठरली.

त्याचा संख्याबळावर परिणाम झाला. पक्षविस्तारासाठी ती काळाची गरज आहे. सत्तेपेक्षा संख्या बळावर लक्ष देणे अधिक महत्त्वाचे आहे. आता निदान शहरातील भय, दहशतवाद यांचे उच्चाटन करायचे असेल तर आपल्या पक्षाचाच उमेदवार निवडून आला पाहिजे. तोही धरसोड करणारा नसावा. असेही गट्टाणी यांनी नमूद केले आहे.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts